‘कोल्हापूर अर्बन’ संचालकांच्या कुलुमनाली दौर्यातील २ लाख ४६ सहस्र रुपयांच्या प्रवास व्ययाच्या चौकशीचे आदेश
कोल्हापूर – ‘कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँके’च्या ६ संचालक प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौर्यावर गेले असता २ लाख ४६ सहस्र रुपये व्यय आला आहे. याविषयी चौकशी करून १५ दिवसांत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था नागूपर यांनी वर्ष २०१७ मध्ये कुलुमनाली येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षणास बँकेचे संचालक शिरीष कणेरकर, जयसिंग माने, मधुसुदन सावंत, विश्वास काटकर, सुभाष भांबुरे आणि यशवंतराव साळोखे गेले होते. प्रशिक्षणाचा कालावधी हा ३ दिवसांचा असतांना ११ दिवस होऊन बँकेचे २ लाख ४६ सहस्र रुपये व्यय करण्यात आले. हे सूत्र लेखापरीक्षणात आल्याने लेखापरीक्षकांनी ठपका ठेवून वाढीव व्यय संबंधित संचालकांनी भरण्याची सूचना केली होती. यानंतरही हे पैसे भरले नसल्याने बँकेचे सभासद उदय मिसाळ यांनी सहकार विभागाकडे तक्रार केल्यानंतर सहकार आयुक्तांनी सदरच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. (प्रशिक्षणाच्या निमित्ताने अथवा अभ्यास दौरे म्हणून अधिकोष, सरकारी विभाग यांचे अधिकारी बाहेरगावी जातात. या दौर्यांची फलनिष्पत्ती काय, याचाही आढावा घेण्याची व्यवस्था असल्याविना त्यांचा लाभ कळणार नाही. – संपादक)
बँकेच्या संचालकांना प्रशिक्षण असतांना मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले हेही सचालकांसमवेत दौर्यावर गेले होते. त्यांनाही उत्तरदायी धरण्यात यावे, अशी मागणी उदय मिसाळ यांनी सहकार विभागाकडे केली आहे.