लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारांत वापरता येऊ शकते का ?  

ओडिशा उच्च न्यायालयाचा आयुष मंत्रालयाला चौकशी करून निर्णय घेण्याचा आदेश

नवी देहली – ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांतील आदिवासीबहुल भागांमध्ये खाण्यात येणारी लाल मुंग्यांची चटणी कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये वापरता येऊ शकते का ? याविषयी ओडिशा उच्च न्यायालयाने आयुष मंत्रालय आणि ‘कौन्सिल ऑफ सँटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’चे महासंचालक यांना लवकरच निर्णय घेण्याची सूचना केली आहे. आयुष मंत्रालयाला यासाठी ३ मासांमध्ये चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्‍वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर उपचार म्हणून करतात. या लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्या यांचा समावेश असतो.

ही याचिका अभियंते नयाधर पाढियाल यांनी प्रविष्ट केली होती. पाढियाल यांच्या मते, या चटणीमध्ये फॉर्मिक अ‍ॅसिड, प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, झिंक आणि लोह यांचा समावेश असतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती भक्कम होते. देशातील अनेक राज्यांतील आदिवासी लाल मुंग्या खातात, तसेच अनेक आजारांवर उपचारांमध्ये त्याचा वापर करतात. त्यामुळेच आदिवासी भागांत कोरोनाचा तितकासा संसर्ग झाला नाही, असा दावा त्यांनी केला.