साटेली (दोडामार्ग) येथील श्री सातेरीदेवी, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव पुरमार यांचा जत्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली येथील श्री देवी सातेरी, श्री देवी शांतादुर्गा आणि श्री देव पुरमार या देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी (३ जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देवस्थानचा इतिहास सांगणारा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
संकलक : श्री. सुनील नांगरे, साटेली-भेडशी, ता. दोडामार्ग.
इतिहास
दोडामार्ग तालुक्यातील गोवा-दोडामार्ग-कोल्हापूर या मुख्य रस्त्यावर दोडामार्ग शहरापासून १२ कि.मी. अंतरावर साटेली गाव आहे. या गावाविषयी माहिती देतांना गावातील जाणकार सांगतात, ‘सध्याचे साटेली गाव आहे, ते पूर्वी गाव नव्हते. या गावातील पूर्वज ‘धर्णेे’ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील ओसरगाव या ठिकाणचे होते. काही कारणास्तव ‘धर्णे’ यांनी तेथील ओसरगावमधील देवतांची पाषाणे घेऊन वाटचाल करत असतांना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावात एक रात्र मुक्काम केला. या ठिकाणी मुक्कामामध्ये एका व्यक्तीने वीर देवांच्या पाषाणाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. त्या ठिकाणी धर्णे यांची काही घरे आहेत. त्यानंतर काही धर्णे कुटुंबियांनी पाषाणमूर्ती घेऊन परत पुढे वाटचाल करत मुडवळे गावात वास्तव्य केले. येथील परिसर पाहून धर्णे कुटुंबियांचे मन रमेना. मग ते सर्वजण परमे गाव मांडली या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी सध्या गाव आणि मंदिर वसलेले आहे. त्या संपूर्ण माळरानावर नैसर्गिक झाडी, सौंदर्य, डोंगरातून वाहत आलेली नदी यांची धणर्र्े यांच्या पूर्वजांनी पाहणी केल्यावर त्यांना ही जागा योग्य वाटल्याने त्यांनी या ठिकाणी मंदिर उभारण्याचा आणि मूर्तींची स्थापना करण्याचा संकल्प केला. त्यानंतर धर्णे यांच्या पूर्वजांनी आजूबाजूच्या ६० गावांतील लोकांना, तसेच मुख्य मानकर्यांना या ठिकाणी बोलावून श्री देवी शांतादुर्गा, श्री देव पुरमार या मूर्तींची स्थापना करून या ठिकाणी भव्य मंदिर उभारले. ६० गावांची अधिपती म्हणून या देवीचा प्रचार व्हावा आणि याची माहिती पुढची पिढी, समाज अन् भाविक यांना व्हावी, म्हणून ६० दगड देवीच्या मूर्तीच्या मागे एका ओळीने उभे करून ठेवल्याचे आजही पहायला मिळतात. साटेली गावचे ग्रामदैवत म्हणून श्री देवी सातेरी, श्री देवी शांतादुर्गा, श्री देव पुरमार यांची स्थापना केल्यावर मंदिराच्या आजूबाजूला १२ अंधाराची मालकीण श्री देवी केळबाय हिची स्थापना करून घुमटी पद्धतीनेे मंदिरे बांधण्यात आली.
साटेली गाव वसवल्यावर पूर्वजांनी मूर्तीची पूजा-अर्चा आणि देखभाल करण्यासाठी पडते (घाडी) यांना साहाय्य करण्यासाठी घेतले. यानंतर देवळी, हरिजन आणि इतर यांनाही देवस्थानात मान देण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत देवीच्या उत्सवात दिलेल्या अधिकारांनुसार प्रत्येक जण आपले कार्य पार पाडतांना दिसतात. त्याचप्रमाणे साटेली गावात शिवमंदिर उभारण्याचा प्रयत्न केल्याचेही जाणकार मंडळी सांगतात आणि त्याची साक्ष इतिहास रूपाने आजही या ठिकाणी पहावयास मिळते. पूर्वी पांडवांनी या ठिकाणी तीर्थक्षेत्रासाठी नदीकिनारी तळीचे खोदकाम केले होते. हे काम करत असतांना पहाटे अचानक कोंबडा आरवल्याने पांडवांनी हा विचार अर्धवट सोडून ते नंतर येथून काही अंतरावर असलेल्या ‘मेढे’ या गावी निघून गेले. पांडवांनी तयार केलेल्या नंदी आणि शंकर-पार्वती यांच्या मूर्तींची पांडवकालीन रचना बाजूला असलेल्या राईमध्ये आजही पाहायला मिळते.
परिसरातील देवता आणि उत्सव
या गावात नवसाला पावणार्या चाळेश्वर देवस्थानाला लागूनच आवाडा या ठिकाणी संस्थानकालीन पाटेश्वर देवस्थान आहे. तसेच साटेली गावात श्री हनुमान मंदिर, गणेश मंदिर, बावळेश्वर देवस्थान आणि इतर देवता यांची मंदिरे आहेत. वार्षिक जत्रोत्सव, देवदिवाळी, शिमगोत्सव, रामनवमी, नारळी पौर्णिमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या दिवशी देेवतांचे कळस वाजत गाजत मंदिराकडे आणले जातात. जत्रेच्या दिवशी श्री देवी शांतादुर्गा हिची खणानारळाने ओटी भरली जाते. त्यानंतर ‘श्रीं’ची पालखीतून मिरवणूक काढली जाते. शिगमोत्सवाच्या कालावधीत घोडेमोडणी दिवशी श्री देव चाळेश्वर या ठिकाणीही नवस बोलण्यासाठी, तसेच देवीचा आशीर्वाद आणि कौल घेण्यासाठी भाविक या ठिकाणी येतात. हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून सहस्रावधी भाविकांनी याची अनुभूती घेतली आहे. सर्व देेवतांच्या मूर्ती पाषाण स्वरूपी असून देवतांचा चेहरा हसरा आहे. देवस्थानची सर्व कामे देवस्थान समिती आणि ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या सल्ल्यानेच चालतात.
जत्रोत्सवाच्या दिवशीचे कार्यक्रम
३ जानेवारी २०२१ या दिवशी सकाळी देवीच्या मूतीवर अभिषेक पूजा-अर्चा आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून देवीच्या दर्शनाला प्रारंभ होणार असून ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम होणार आहेत. पावणीचा कार्यक्रम झाल्यावर श्रींची पालखी मिरवणूक काढली जाईल आणि रात्री दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. दुसर्या दिवशी पहाटे दहीकाल्याने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जत्रोत्सव साध्या पद्धतीने कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.