नायलॉन मांजा बाळगणार्यांवर गुन्हे नोंद करण्याचा संभाजीनगर खंडपिठाचा आदेश
नायलॉन मांजा बाळगणार्यांवर गुन्हे नोंद करावेत, असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो. सर्व यंत्रणा हाताशी असणारी पोलीस यंत्रणा या प्रकरणाचे संपूर्ण अन्वेषण आणि दोषींवर कारवाई करून त्याचा अहवाल स्वतःहून न्यायालयात का सादर करत नाही ?
संभाजीनगर – चिनी नायलॉन मांजा बाळगणार्यांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी नुकतेच पोलिसांना दिले आहेत. मांजा पुरवणारे, खरेदी आणि विक्री करणारे अन् पतंगाला लावून उडवणार्या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. किती जणांवर कारवाई केली ? यासंबंधीचा अहवाल खंडपिठात सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
४ दिवसांपूर्वी नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकीवर मागे बसून जाणार्या महिलेचा मृत्यू झाला. नागपूर येथे नायलॉन मांजामुळे १ विद्यार्थी गंभीर घायाळ झाला. माध्यमांमधील वृत्तांची नोंद घेत खंडपिठाने स्वतःहून (सुमोटो) याचिका प्रविष्ट करून घेतली. नायलॉन मांजामुळे पक्षी घायाळ होण्याचे आणि मृत होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. संभाजीनगर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा येथे अशा प्रकारे मांजा वापरणार्यांवर काय कारवाई केली ? किती साठवणूकदारांवर छापे मारले, किती गुन्हे नोंद केले, मांजा वापराच्या बंदीसंबंधी राष्ट्रीय हरित लवादाने ११ जुलै २०१७ या दिवशी दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जात आहे काय, अशी विचारणा खंडपिठाने केली आहे.