पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांतील गावठाण क्षेत्राचे नगर भूमापन होणार !
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
पनवेल – येथील महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे, भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज सिद्ध करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्या संदर्भातील अध्यादेश शासनाकडून १ जानेवारी या दिवशी काढण्यात आले आहेत. या संदर्भात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी आणि पाठपुरावा केला होता, त्यानुसार हा अध्यादेश लागू झाला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील देवीचापाडा, चाळ, घोट, कळंबोली, रोडपाली, पडघे, पालेखुर्द, ढोंगर्याचा पाडा, टेंभोडे, बिड, आडिवली, रोहींजण, नागझरी, तळोजे मजकूर, खिडूकपाडा, वळवली, आसुडगाव, धानसर, धरणागाव धरणाकॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले आणि कोयनावेळे या महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे, नगर भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा अन् मालकी हक्क दस्तावेज सिद्ध करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.