ओरोसचे (कुडाळ) ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव
संकलक : श्री. रवींद्र परब, ओरोस, सिंधुदुर्ग
श्री देव रवळनाथ हे ओरोस गावचे जागृत ग्रामदैवत आहे. श्री देव रवळनाथाच्या देवळाची रचना पुष्कळ प्राचीन आहे. श्री देव रवळनाथाबरोबरच पावणाई, बाराचा पूर्वस, नित, अवनित, श्री काळंबादेवी देवतांचीही प्रतिष्ठापना केलेली आहे. मंदिरात रवळनाथ, भूतनाथ, गांगो, पावणाई, काळकाई, नवलाई अशी ६ तरंगे आहेत, तसेच मंदिर परिसरात मारुतीचे जागृत देवस्थान आहे.
मंदिर परिसराचे सुशोभिकरण करून मंदिराच्या सभोवती बागबगीचा, छोटा तलाव, बालउद्यान, धर्मशाळा, भक्त निवास, विश्रांतीगृह, ग्रंथालय यांसह सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. श्री देव रवळनाथ हे यात्रास्थळ झाल्याने आणि या ठिकाणी भक्तनिवास असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात.
मंदिरात प्रतिवर्षी दसरा, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सव कार्यक्रम होतो. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी ३ जानेवारी २०२१ या दिवशी जत्रोत्सव साजरा होणार आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ९ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत दर्शन, ओटी भरणे हे कार्यक्रम होतात. रात्री १२ वाजता पालखी आणि तरंग यांची मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग होतो. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता दहीकाल्याने जत्रेची सांगता होते. प्रतिवर्षी जत्रोत्सवाला सहस्रावधी भाविक उपस्थित असतात.
ओरोस गावची प्रगती ग्रामदेवतेच्या कृपेमुळेच झाली, अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे.
जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन
यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जत्रोत्सव साध्या पद्धतीने कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.