गावागावांत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाकडून ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – ‘महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन’च्या अंतर्गत ‘फिल्ड किट’द्वारे (FTK) पाण्याची गुणवत्ता तपासण्याविषयी ‘जलजीवन मिशन’द्वारे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ५ महिलांना जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित महिलांद्वारे आता गावातील शुद्ध पाण्यावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी आणि स्वच्छता विभाग) विनायक ठाकुर यांनी दिली.
‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्यासह गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. ‘राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन’ यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ५ महिलांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या महिलांना २२ ते २९ डिसेंबर २०२० या कालावधीत १९ ‘गट’ करून करून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक आणि खासगी स्रोत यांची माहिती देण्यात आली, तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची निगा कशी राखावी आणि स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम, पाण्याची गुणवत्ता तपासणे, ‘फिल्ड टेस्ट किट’चा वापर करून पाण्याची तपासणी कशी करावी, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण कसे करावे ? याविषयी माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील २ सहस्र महिलांनी सहभाग घेतला होता.