‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, या व्रताचे स्वत: पालन करून इतर धर्मप्रेमींकडूनही ते करवून घेणारे ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते !
‘२१.१२.२०२० या दिवशी ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (पू. महाराज) यांनी देह ठेवला. मी पूर्वी मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा हिंदु जनजागृती समितीचा समन्वयक म्हणून सेवा करतांना माझा त्यांच्याशी काही वेळा संपर्क आला. ह.भ.प. बापू महाराज रावकर यांच्या समवेत मी त्यांना भेटत असे. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असे परिपक्व वारकरी संत !
पू. महाराज यांनी लहानपणापासून हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता आणि ते लहानपणापासून वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत. ८० वर्षे वय असतांनाही ते सहस्रो किलोमीटर प्रवास करून कीर्तन, प्रवचने, अधिवेशन आणि आंदोलन यांत सहभागी होत असत. त्यामुळे ते प्रस्तावित (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन कि खून, श्रीराम सेतू ऐतिहासिक कि काल्पनिक इत्यादी धर्मद्रोही विषयांचे परखड भाषेत खंडण करून समाजात जागृती करत. कीर्तने, प्रवचने आणि वारकर्यांच्या अधिवेशनातील भाषणे यांतून ते जनजागृती करत असत. त्यांचा वारकरी संप्रदाय आणि हिंदु समाज यांमध्ये मोठा अधिकार होता; म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाचे पितामह, धर्मनिष्ठ, धर्मभूषण अशा अनेक पदांनी संबोधले जाते. यावरून ते वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असे परिपक्व वारकरी संत होते.
२. शासनाशी चर्चा करणे आणि आंदोलनात सहभागी होणे यांसाठी उतारवयातही तरुणाप्रमाणे उत्साहाने सहभागी होणे
मुंबई येथील आझाद मैदानातील आंदोलनासाठी सहभागी होण्यासाठी ते शेकडो किलोमीटर प्रवास करून यायचे. निवेदन देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आमच्या समवेत मंत्रालयात येत असत. प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांच्या राष्ट्रीय वारकरी सेनेच्या ‘लेटरहेड’वर (संघटनेचे पत्र) निवेदने देणे आणि प्रसिद्धी पत्रक काढायला सांगत. वयाच्या ८० व्या वर्षीही धर्मरक्षणासाठी त्यांचा ‘तरुणांना लाजवेल’, असा उत्साह होता.
३. कीर्तनातून हिंदु धर्माची जनजागृती करून धर्मरक्षण करण्यास प्रोत्साहित करणे
मला त्यांचे २ वेळा कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली. कीर्तनात ते उत्तम रीतीने निरुपण करत असत. मधेच हिंदु धर्मावरील आघातांविषयी माहिती देत. धर्मरक्षणासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत, हे स्वतःच्या उदाहरणातून सांगत असत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धर्म नष्ट करण्याचे कार्य, पुरोगामी म्हणवणारे, हिंदु धर्मग्रंथांना विरोध करणारे, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी धर्मद्वेष्ट्यांवर ते परखडपणे टीका करत आणि ‘त्यांना विरोध कसा करायचा ?’, याविषयी मार्गदर्शन करत. ते त्यांच्या कीर्तनातून धर्मकार्य करणार्या सनातन संस्थेविषयी माहिती सांगत असत. ‘सनातन संस्थेसारखे धर्मकार्य केले पाहिजे’, असे कीर्तनात सांगत असत. कीर्तन चालू असतांना आम्हाला व्यासपिठावर बोलावून आमची ओळख करून देत असत. कीर्तन संपल्यावर आमच्याशी बोलत असत आणि महाप्रसाद घेतल्यावरच तिथून निघण्याची अनुमती देत.
४. धर्मासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करणे
ते सनातनच्या आश्रमात आल्यावर त्यांनी आश्रमातील विविध सेवा आणि साधना यांविषयी जिज्ञासेने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून माहिती करवून घेतली. ‘त्यांचा अहं अत्यल्प आहे’, हे मला शिकायला मिळाले. ते कीर्तनासाठी बाहेरगावी गेल्यावर गोरगरिबांच्या घरी रहात असत. त्यांच्यात बडेजावपणा किंवा मोठेपणा नव्हता. ते पैशासाठी किंवा व्यवसाय म्हणून कीर्तन आणि प्रवचन करत नसत. ते केवळ धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांची सेवा म्हणून सर्वकाही करत होते. त्यांना जी बिदागी (कीर्तनकाराला दिलेले पैसे) मिळत असे, ते स्वतःच्या संसारासाठी न वापरता धर्मकार्यासाठी अर्पण करत असत. आंदोलने, अधिवेशन किंवा इतर धर्मरक्षणाच्या कार्यासाठी ते अर्पण देत होते. यावरून ‘त्यांनी धर्मकार्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग केला’, असे वाटते.
५. शासनकर्त्यांच्या कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता धर्माच्या बाजूने खंबीरपणे उभे रहाणे
अंधश्रद्धा निर्मूलन आणि मंदिर सरकारीकरण हे प्रस्तावित कायदे तत्कालीन सरकारला आणायचे होते. प्रस्तावित कायदा करणार्या अशा लोकांचा धर्मप्रेमी आणि धर्मरक्षण करणार्यांना त्रास होत असे. त्या वेळी पू. वक्ते महाराज हे धर्माच्या आणि धर्मरक्षण करणार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात असत. हे ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि मी काही प्रसंगात अनुभवले आहे.
६. विडंबन आणि धर्महानी रोखण्यासाठी सदैव तत्परतेने सहभागी होणे
धर्माविषयी तात्त्विक भाग सांगणारे पुष्कळ असतात; मात्र पू. वक्ते महाराज यांच्यासारखी धर्मरक्षणाची सेवा करणारा विरळाच असतो. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रभाव पुष्कळ आहे. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मरक्षणाच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांनी धर्मरक्षणाच्या कार्यात स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेऊन आदर्श निर्माण केला. ते माझ्या समवेत राष्ट्रीय वारकरी सेना या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांना पाठवायचे. हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांनी एकत्रित येऊन अंधश्रद्धा निर्मूलन आणि मंदिर सरकारीकरण या प्रस्तावित कायद्याला विरोध केला. पार्ले बिस्कीट आस्थापनाने धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन केले होते. त्यांच्याशी बैठका घेऊन आणि वैध मार्गाने विरोध केल्याने त्यांनी त्वरित विज्ञापन बंद केले. ‘थरारली वीट’ हे नाटक आंतर्महाविद्यालय नाट्यस्पर्धेत अंतिम फेरीत आले होते. त्यामध्ये ‘वारीमध्ये वेशाव्यवसाय कसा चालतो ?’, हे दाखवून धार्मिक भावना दुखावल्या होत्या. त्याला विरोध केल्याने ते नाटक स्पर्धेतून रहित करावे लागले. नाहीतर ते प्रायोगिक रंगभूमीवर येणार होते, त्यालाही विरोध केल्याने ते रहित झाले. अशा रीतीने जेथे धर्महानी होते, तेथे पू. वक्ते महाराजांचे समितीच्या कार्यात ह.भ.प. बापू महाराज यांच्या माध्यमातून साहाय्य झाले.
‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, म्हणजे ‘धर्मद्रोही विचारांचे खंडण हेसुद्धा धर्मरक्षणच !’, हे व्रत त्यांनी घेतले होते. त्यांनी आयुष्यभर त्याचे पालन केले आणि इतर धर्मप्रेमींकडूनही करवून घेतले. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वहातो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.१२.२०२०)