गोमंतकीय हिंदूंवर इन्क्विझिशनद्वारे अनन्वित अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोप यांनी भारतियांची माफी मागावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
|
पणजी – ख्रिस्ती मिशनर्यांनी ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मच्छळाच्या) नावाने पोर्तुगीज राजसत्तेच्या आधारे गोमंतकीय हिंदूंवर निर्दयी आणि अनन्वित अत्याचार केले. ख्रिस्त्यांचे धार्मिक प्रमुख पोप यांनी जगात अन्य ठिकाणी ‘इन्क्विझिशन’ केलेल्या ठिकाणच्या जनतेची जाहीर क्षमा मागितली; मात्र गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी त्यांनी आजपर्यंत माफी मागितलेली नाही. समानता हा मानवतेचा दृष्टीकोन देणारे ख्रिस्त्यांचे पोप रंगभेद किंवा वंशभेद अशी विषमता बाळगून माफी मागण्याचे टाळत आहे का ? जिहाद्यांप्रमाणे किंवा त्याहून अधिक भीषण क्रौर्य असलेल्या आणि मानवतेला कलंक असलेल्या या ‘इन्क्विझिशन’विषयी पोप यांनी भारतियांची किंवा हिंदूंची त्वरित माफी मागावी. याविषयी आंदोलन होणे आवश्यक आहे. पोप भारताला अजूनही ‘सॉफ्ट टार्गेट’ मानतात का ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने दोन दिवस आयोजित केलेल्या ऑनलाईन ‘धर्मसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी केले.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेल्या मार्गदर्शनातील महत्त्वपूर्ण सूत्रे
गोव्याला लाभलेला आध्यात्मिक इतिहास
महाभारतामध्ये गोव्याच्या उल्लेख ‘गोपराष्ट्र’ असा आहे. ‘गाय चरायला नेणार्यांचा प्रदेश’ असा त्याचा अर्थ होतो. तत्पूर्वी गोव्याला परशुरामभूमी म्हणून संबोधित केले जात होते. परशुरामभूमी म्हणजे दक्षिणेत केरळपासून गोवा ते उत्तरेत गुजरातपर्यंतची भूमी ! भगवान परशुराम यांनी बाण मारून गोमंतकाची निर्मिती केली. याविषयीचा संदर्भ गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांमध्ये आजही दिसून येतो. गोव्यात ‘बाणावली’, असे एका गावाचे नाव यावरूनच आले आहे. उत्तर गोव्यात हरमल येथे एका पर्वतावर भगवान परशुराम यांचे यज्ञ करण्याचे स्थान असल्याचे मानले जाते. यावरून गोव्याचा आध्यात्मिक इतिहास लक्षात येतो. संस्कृतच्या काही पुरातन स्रोतानुसार गोव्याला ‘गोपकपुरी’ किंवा ‘गोपकपट्टन्’ असे संबोधले जात होते. ‘हरिवंशम्’ आणि ‘स्कंदपुराण’ यांमध्येही असा उल्लेख आढळतो. ‘गोवांचल’, ‘गोवे’, ‘गोवापुरी’, ‘गोपकापाट्न’, ‘गोमंतक’, अशा प्रमुख नावाने गोव्याची धार्मिक परंपरा लक्षात येते. गोमंतकावर यापूर्वी मौर्यवंश, करवीर सातवाहन वंश, कदंब वंश, बदामीचे चालुक्य वंश आदींनी राज्य केले. १३ व्या शतकात अल्लाऊद्दीन खिलजी याने गोमंतकावर राज्य करण्यास प्रारंभ केल्यावर गोमंतकाच्या काळ्या इतिहासाला प्रारंभ झाला. यानंतर पोर्तुगिजांनी गोमंतकावर सुमारे ४५० वर्षे राज्य केले.
ख्रिस्ती मिशनर्यांचा इतिहास हा जिहादी आक्रमकांप्रमाणेच क्रौर्याने भरलेला !
‘इन्क्विझिशन’च्या नावाने गोमंतकीय हिंदूंवर अनन्वित आणि अत्यंत निर्दयीपणे अत्याचार करण्यात आले. हिंदूंची क्रौर्यतेने हत्या करणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे आदी मानवतेला कलंकित करणारी अनेक दुष्कृत्ये केली आहेत. ख्रिस्ती मिशनर्यांचा हा इतिहास म्हणजे जिहादी आक्रमकांप्रमाणेच क्रौर्याने भरलेला आहे. पोर्तुगालची मिशनरी वृत्ती ही जिहाद्यांप्रमाणेच असल्याचे ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून समोर येते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोव्याला गुलामीतून मुक्त करणारे शासनकर्ते लाभणे, हे हिंदूंचे दुर्दैव !
भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रातील तत्कालीन नेहरू शासनाने गोवा स्वतंत्र करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोमंतक पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. गोमंतकीय हिंदूंना १४ वर्षांचा वनवास आणि दास्यत्व भोगावे लागले. असे शासनकर्ते लाभणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. अशा सत्ताधार्यांचा कितीही निषेध केला, तरी तो अल्पच ! स्थानिक स्वातंत्र्यसैनिक पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात बंड करून गोवा स्वतंत्र करू शकतात, हे लक्षात आल्यावर भारत सरकारला जाग आली आणि नंतर भारतीय सेनेने ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त केला.
तथाकथित निधर्मी (सेक्युलर) राजसत्तेने पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनरी आणि इन्क्विझिशन यांचे समर्थन करत सत्य दडपून ठेवले. त्यांची खोटी मानवतावादी प्रतिमा भारतियांसमोर ठेवली. हा विश्वासघात भारतीय कधीही विसरणार नाहीत. आज गोव्याचा गौरवशाली इतिहास अंधारात ठेवून गोवा केवळ युरोप किंवा ख्रिस्ती यांच्यासाठी पर्यटनस्थळ बनवले.
मानवतेच्या गोष्टी करणार्या युरोपचा काळाकुट्ट चेहरा सर्वांसमोर येणे आवश्यक !
जेसुएट मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांनी पत्राद्वारे गोव्यात ‘इन्क्विझिशन’ लादण्याची मागणी केली. ‘इन्क्विझिशन’ म्हणजे पोर्तुगालची धर्मसमीक्षण सभा. या धर्मसमीक्षण सभेच्या माध्यमातून हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर करणे, ख्रिस्ती धर्म स्वीकारूनही छुप्या पद्धतीने स्वधर्माचे पालन करणार्या हिंदूंचे हातपाय कापणे, हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणे, हिंदूंची क्रौर्यतेने हत्या करणे, हिंदूंचे धर्मग्रंथ आणि मंदिरे नष्ट करणे आदी प्रकारे हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला. ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून ख्रिस्ती मिशनर्यांनी स्वत:चे धार्मिक व्यापारी हित जपून हिंदूंचे धर्मांतर केले. फ्रान्सिस झेवियर हा पाताळयंत्री आणि अनन्वित अत्याचारी होता. इतिहासातील काही दस्तऐवजानुसार ‘इन्क्विझिशन’च्या काळात १६ सहस्र २०२ व्यक्तींचे अपराधी मानून ‘इन्क्विझिशन’ न्यायालयासमोर सुनावणीसाठी आणले होते. जाणकारांच्या मते यामधील ७० टक्के लोकांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला. ‘इन्क्विझिशन’संबंधी सर्व कागदपत्रे जाळण्यात आल्याने याविषयीची माहिती मिळणे आता कठीण आहे. मानवतेच्या गोष्टी करणार्या युरोपचा काळाकुट्ट चेहरा ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून सर्वांसमोर येणे आवश्यक आहे.
सनातन हिंदु धर्म नष्ट करून संपूर्ण विश्व ख्रिस्तीमय करण्याचा ख्रिस्ती मिशनर्यांचा राक्षसी हेतू उघड !
‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोमंतकियांवर अनेक निर्बंध घातले. हिंदूंना अंत्यविधी आणि सरकारी कार्यालयात अधिकारीपद ग्रहण करण्यास निर्बंध घालण्यात आले. वडिलांचा मृत्यू झाल्यावर मुलाला धर्मांतरासाठी जेसुएटच्या स्वाधीन करणे, सर्व ग्रामसभेतील हिंदु लिपिकांना हटवून मूळ ख्रिस्ती किंवा धर्मांतरित ख्रिस्ती यांची नेमणूक करून प्रशासनाचे ख्रिस्तीकरण करणे, गावात पंच या नात्याने केवळ ख्रिस्त्यांनाच अधिकार देऊन न्यायव्यवस्थेचेही ख्रिस्तीकरण करणे, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणे, नवीन मंदिरे उभारण्यास वा त्यांचा जीर्णोद्धार करण्यास न देणे आदी निर्बंध लादण्यात आले. पोर्तुगाल व्यापारी बनून आले आणि त्यांचे खरे स्वरूप येथे उघड झाले. यामधून ख्रिस्ती मिशनर्यांचा सनातन हिंदु धर्म नष्ट करून संपूर्ण विश्व ख्रिस्तीमय करण्याचा राक्षसी हेतू उघड होतो. त्यांचा खरा चेहरा आज उघड करण्याची आवश्यकता आहे. हा सत्य इतिहास लपवण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात जागृती होणे आवश्यक आहे. हिंदूंना सत्य इतिहास सांगून त्यांच्यामध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. इतिहासाच्या स्मृती जागृत ठेवल्यास चांगला इतिहास घडवता येतो अन्यथा अधोगती निश्चित आहे.
#GoaInquisition पोर्तुगीज सत्ता के ‘इन्क्विजिशन’ अत्याचारों के समय बलिदान देनेवाले गोमंतकीय हिन्दुओं की अस्मिता का प्रतिक रहे ‘हातकातरो’ खंबा आज भी उपेक्षित है । @ASIGoI @GoaCM कृपया हात-कातरो खंबे की ऐतिहासिक पुरातन वास्तु दर्जा देकर उसका त्वरित संवर्धन करें।@ShefVaidya pic.twitter.com/PowfjFYnQG
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) December 19, 2020
‘इन्क्विझिशन’ लादणारा लाखो हिंदूंच्या हत्येचा आरोपी
पोर्तुगीज राज्यव्यवस्था ही सैतानी होती. गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’ लादणारा लाखो हिंदूंच्या हत्येचा आरोपी आहे आणि वर्तमान न्यायव्यवस्थेच्या आधारे अशा अपराध्याला त्याने केलेल्या अपराधासाठी १०० वेळा फाशी द्यावी लागेल. या व्यक्तीला ‘संत’ घोषित करून त्याच्या नावाने संपूर्ण भारतात शिक्षण संस्था चालवणे, हे मानवतेचे अपयश आहे. धार्मिक अनन्वित अत्याचार करणार्याचे हे समर्थन केल्यासारखे आहे.
गोव्यातील हिंदूंचा धार्मिक इतिहास सुवर्ण पानांनी लिहिण्यायोग्य !
‘इन्क्विझिशन’चा काळा इतिहास भोगलेल्या गोमंतकीय हिंदु बांधवांची शौर्यगाथा पुष्कळ श्रेष्ठ आहे. गोमंतकातील हिंदूंनी गावातील देवतांची मूर्ती घेऊन जंगलात, गुहेत लपून राहून देवतांचे रक्षण केले. या काळात स्वधर्म, स्वसंस्कृती आणि परंपरा यांच्या रक्षणासाठी गोमंतकीय हिंदूंनी केलेला संघर्ष हा धार्मिक इतिहासात सुवर्ण पानांनी लिहिण्यासारखा आहे; मात्र यावर आज चर्चा केली जात नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ हा स्वधर्मासाठी अनन्वित अत्याचार भोगणार्या स्वाभिमानी हिंदूंचे प्रतीक !
जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ हा ‘इन्क्विझिशन’चे सध्याचे प्रतीक आहे. ‘हातकातरो खांबा’विषयी पुरातत्व विभागाने माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत एकदा ‘खांब सध्या अस्तित्वात आहे’ आणि नंतर एकदा ‘तो अस्तित्वात नाही’, अशी माहिती दिली. वास्तविक ‘हातकातरो खांब’ हा स्वधर्मासाठी अनन्वित अत्याचार भोगणार्या स्वाभिमानी हिंदूंचे प्रतीक आहे. ‘हातकातरो खांबा’ला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करणे आणि याविषयीचा अन् गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणे आवश्यक आहे. ‘हातकातरो खांबा’चे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, हे शोधले पाहिजे. स्वधर्म आणि स्वराष्ट्राभिमान यांचा अभाव असणे, मानसिक गुलामगिरी बाळगणे, याचे हे लक्षण आहे. सत्य सांगणार्यांना आज ‘जुन्या गोष्टी का सांगता ?’, असे सांगून कट्टरवादी असे संबोधले जात आहे. ही मानसिकता पालटली पाहिजे. मानसिक गुलामगिरीचा त्याग करून स्वधर्म आणि स्वसंस्कृती यांचा अभिमान बाळगला पाहिजे.