कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वयंशिस्तीला सर्वाेच्च प्राधान्य द्यावे लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुंबई – ‘पुनश्च: हरि ॐ’ म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने चालू करत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर स्वयंशिस्त पाळण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. ख्रिस्ती नववर्ष २०२१ च्या स्वागतार्थ जनतेला शुभेच्छा देतांना त्यांनी वरील आवाहन केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विशेषत: नवीन पिढीवर याचे अधिक दायित्व आहे. नव्या वर्षात दायित्व असलेले नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. आपली आव्हाने न्यून होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात; परंतु त्यांचा सामना सावधपणे अन् शिस्तबद्ध पद्धतीने करूया. कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्यासह अन्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प नवीन वर्षासाठी करूया.’’