झारखंड पोलिसांच्या ट्विटर खात्यावर पोलिसांच्याच विरोधात अधिक तक्रारी !
जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही. पोलिसांच्या वृत्तीत पालट करण्यासाठी त्यांना साधना शिकवणे महत्त्वाचे !
रांची (झारखंड) – झारखंड राज्याच्या पोलिसांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात ७ सहस्र ९०७ तक्रारी करण्यात आल्या. त्यातील १ सहस्र २०१, म्हणजे सर्वाधिक तक्रारी झारखंड पोलिसांच्याच विरोधात करण्यात आल्या. यांतील १ सहस्र १४४ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, तर एकूण तक्रारींपैकी ७ सहस्र ३८५ यांचे निवारण करण्यात आले आहे. उर्वरित ५२२ तक्रारींची चौकशी करण्यात येत आहे.
या तक्रारींमध्ये कोरोनाच्या काळात सामाजिक अंतराचे पालन न करण्यात आल्याच्या तक्रारींची संख्या सर्वाधिक होती. महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांविषयी ४१६ तक्रारी होत्या. अन्य तक्रारींमध्ये मारहाण, गोवंशांची तस्करी, फसवणूक, धार्मिक तणाव निर्माण करणार्या पोस्ट, सरकारी भूमीवरील अतिक्रमण, अवैध कोळसा उत्खनन आदींचा समावेश होता.