मेंदूवरील शस्त्रकर्माच्या वेळी रुग्ण महिलेकडून श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठण !
आपत्काळात हिंदूंनी अशी श्रद्धा ठेवून ईश्वरी अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न केला, तर ईश्वर त्यांचे रक्षण नक्कीच करील; मात्र त्यासाठी अतापासून प्रयत्न चालू केले पाहिजेत !
कर्णावती (गुजरात) – सूरत येथील ३६ वर्षीय महिला दयाबेन भरतभाई बुधेलिया यांच्या मेंदूमध्ये गाठ असल्याने ती काढण्यासाठी यशस्वीपणे ‘ओपन सर्जरी’ करण्यात आली. त्यांना ‘अवेक अॅनेस्थेसिया’ देण्यात आला होता. त्यामुळे त्या शस्त्रकर्माच्या वेळी त्या जाग्या होत्या. शस्त्रकर्माच्या सवा घंट्यामध्ये त्या सतत श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण करत होत्या. याविषयी शस्त्रकर्म करणारे डॉ. कल्पेश शहा यांनी सांगितले, ‘मी आतापर्यंत ९ सहस्रांहून अधिक ‘ओपन सर्जरी’ केल्या आहेत; मात्र त्या काळात गीतेच्या श्लोकांचे पठण करणारा रुग्ण पहिल्यांदाच पाहिला. या शस्त्रकर्मानंतर दयाबेन यांना ३ दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला.’ शस्त्रकर्म करतांना गीतेचे श्लोक म्हणण्याची दयाबेन यांनी डॉक्टरांकडे अनुमती मागितल्यावर त्यांना ती देण्यात आली होती.
(सौजन्य : TV9 Gujarati)
शस्त्रकर्माच्या वेळी भगवान श्रीकृष्ण शेजारी उभा आहे, असे वाटले ! – दयाबेन यांचे पती
दयाबेन यांचे पती भरतभाई यांनी सांगितले की, आम्ही या शस्त्रकर्माच्या विचाराने घाबरलो होतो; मात्र आमची देवावर श्रद्धा होती. जेव्हा दयाबेन शस्त्रकर्माच्या वेळी श्लोक पठण करत होती, तेव्हा असे वाटले की, स्वयं भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिला आहे. दयाबेन यांनी सांगितले की, गीतेचे ज्ञान मला लहानपणीच आईवडिलांकडून मिळाले होते. माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे. मी हेच संस्कार माझ्या मुलांवरही केले आहेत.