‘चांदा ते बांदा’ योजना बंद करून महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्गची हानी केली ! – रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते
सावंतवाडी – राज्य सरकारने विकासासाठी निधी दिला तर नाहीच, उलट यापूर्वी आलेला निधीसुद्धा परत घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आणलेल्या ‘चांदा ते बांदा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला विद्यमान सरकारने तिलांजली दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची हानी झाली आहे. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आलेला निधीही परत घेतला. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी लागणारे कोट्यवधी रुपये संमत होण्यासाठी सांघिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. आम्ही विकासाला लागणारा निधी अल्प पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजपचे नेते माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमीपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलतांना आमदार चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचा कालावधी असतांनाही अडचणीच्या काळात नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. याआधीच्या नगराध्यक्षांनी आलेल्या पैशांचा विनियोग केला नाही; मात्र मागील एका वर्षात नगराध्यक्ष संजू परब यांनी चिकाटीने काम केले. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी सांघिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’