परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन
५ जुलै२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या निमित्ताने साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्या वेळी साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्यामुळे ‘बुद्धीने अध्यात्माचा तात्त्विक भाग समजून घेण्याचा प्रयत्न करणे’, म्हणजे जीवन व्यर्थ घालवण्यासारखे आहे !
साधक : जेव्हा व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासाचा आरंभ एका चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत होऊन एका ठराविक आध्यात्मिक प्रगती झालेल्या स्थितीत असेल (कुणी व्यक्ती एका कुंडलिनीचक्रापासून वरच्या चक्रापर्यंत आध्यात्मिक प्रवास करत असेल), तर ते कशा प्रकारे समजते ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : जेव्हा साधना कराल, तेव्हा एक-एक स्वभावदोष निघून जातो. एक चक्र, नंतर दुसरे चक्र जागृत झाल्याची अनुभूती येते. अध्यात्म हे तात्त्विक शास्त्र नाही, तर कृतीत आणायचे शास्त्र आहे आणि अध्यात्म तर अनंताचे शास्त्र आहे. अनंत प्रश्न मनात येत रहातात. जर काही प्रश्नोत्तरांनंतर पुन्हा प्रश्नोत्तर, असे बुद्धीच्या पातळीवर राहिलो, तर आध्यात्मिक उन्नती कधीच होणार नाही. जे शिकले, ते कृतीत आणायला हवे.
२. कोणताही साधनामार्ग असला, तरी तन, मन आणि धन यांचा त्याग करणे आवश्यक !
परात्पर गुरु डॉ. आठवले : शेवटी एकच आहे, ‘कोणताही साधनामार्ग असोे, तन-मन-धन यांचा त्याग करायला हवा. प्रकाश आणि अंधार एकत्र कधीच नसतात. त्याच प्रकारे ईश्वर आणि मायेतील जग एकत्र कसे असणार ?
३. स्वभावदोष आणि अहं न्यून झाल्यावर आनंदाची अनुभूती येऊन नामजप चालू रहातो !
परात्पर गुरु डॉ. आठवले : त्याग करण्यासाठी धैर्य लागते. टप्प्याटप्प्याने प्रयत्न केले, तर स्वभावदोष दूर होतात आणि अहं न्यून होतो. त्या वेळी मनाला आतून आनंदाची अनुभूती येऊ लागते. आईस्क्रीम किंवा श्रीखंड खाल्ले, तर चांगले वाटते. त्या वेळी ‘ते आणखी खावे’, असे वाटते. त्याच प्रकारे नामजपातून जेव्हा आनंदाची अनुभूती येऊ लागते, तेव्हा नामजप चालूच रहातो. नंतर कुणाला काही करावेच लागत नाही. आपल्याला तात्त्विक गोष्टींत जायचे नाही. ते जीवन व्यर्थ घालवण्यासारखे आहे.
४. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करण्यात साधनेचा अमूल्य वेळ व्यर्थ जात असल्याने वर्तमानकाळात रहाणे महत्त्वाचे आहे !
परात्पर गुरु डॉ. आठवले : बेळगावचा एक साधक आला होता. त्याचा पाय कापलेला (अॅम्प्युटेटेड) होता. एकदा तो दुचाकीवरून जात होता. त्याच्या पुढे एक ट्रक होता. तो महामार्गावर होता. दोघेही जलद गतीने जात होते. अकस्मात् ट्रकचालकाने ट्रक थांबवल्यामुळे तो ट्रकवर जाऊन धडकला. दुचाकी त्याच्या पायावर पडली आणि त्याचा अस्थिभंग झाला. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘पाय कापावा (अॅम्प्युटेट) लागेल. त्यांनी त्याचा पाय कापला. जेव्हा तो मला हे सर्व सांगत होता, तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मी एका ज्योतिषाकडे गेलो होतो. मी ज्योतिषाला विचारले, ‘‘माझ्या आयुष्यात असे का घडले ?’’ ज्योतिषाने जे सांगितले, त्यावरूनही समजते, ‘आपले ज्योतिषशास्त्र किती प्रगत आहे !’ ज्योतिषाने अभ्यास करून त्याला सांगितले, ‘‘मागील जन्मी तू गायीच्या पायाला दगड मारला होता. त्यामुळे ती घायाळ झाली होती. ते तुला या जन्मी भोगावे लागत आहे.’’ नंतर त्याला आठवले, ‘अपघात झाला होता. तेव्हा सर्व लोक त्या ट्रकचालकाला ओरडत होते, ‘‘ट्रक अकस्मात् का थांबवला ?’’ तेव्हा त्याने उत्तर दिले होते, ‘‘एक गाय रस्त्यात आली होती. तिला वाचवण्यासाठी मी ट्रक थांबवला.’’ साधकाला फार चांगले वाटले. मी म्हटले, ‘‘आता ज्योतिषाकडे जाऊन त्याला विचारा, ‘त्याच्या आधीच्या जन्मात गायीने काय केले होते ?, ज्यामुळे तुम्ही तिला दगड मारला ?’ नंतर आणखी मागच्या जन्मात तुम्ही जा आणि गायीने काय केले आणि तुम्ही काय केले ? गायीने काय केले आणि तुम्ही काय केले ?’’ असे विचारत रहा. बुद्धीवादी व्यक्तीचे असेच होते. तिचे जीवन व्यर्थ जाते. त्यात काही अर्थ नाही. आता या स्थितीत काय करावे ? वर्तमानकाळात रहावे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना काही किंमत नाही. जे भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार करतात, अभ्यास करतात, ते साधनेचा अगदी अमूल्य वेळ व्यर्थ घालवतात. आयुष्य नष्ट होऊन जाते. साधनेसाठी एक-एक मिनिट महत्त्वाचे असते.
(क्रमशः उद्याच्या अंकात)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |