शिरोडा (गोवा) येथील श्री शिवनाथदेवाचा जत्रोत्सव
गोव्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान, हे शिरोड्यातील सर्वांत जुने देवस्थान आहे. शिरोड्याचा बाजार ओलांडून सावर्डेच्या रस्त्याने काही अंतर चालत गेल्यास ठळकपणे या देवस्थानची वास्तू नजरेत भरते. प्रत्येक गावात त्या गावचे आद्य रहिवासी असतात, त्याचप्रमाणे ग्रामदेवताही असतात. शिरोड्यातही अशा १३ ग्रामदेवतांचे वास्तव्य आहे.
गावात कोणतीही नवी गोष्ट करायची असल्यास वा धार्मिक कार्य करायचे असल्यास ग्रामस्थ प्रथम या देवतांना वंदन करतात. या सर्वांमध्ये शिवनाथाला प्रमुख स्थान आहे. मंदिरासमोर एक छोटीशी टेकडी आहे. तेथे सिद्धपुरुषाच्या पादुका आहेत. या सिद्धपुरुषाने सुमारे ४०० वर्षांपूर्वी श्री शिवनाथाची स्थापना केली. असा उल्लेख ग्रामसंस्थेच्या इतिहासात सापडतो. श्री शिवनाथाव्यतिरिक्त
श्री मंडलेश्वर, श्री रवळनाथ, श्री माधव, श्री महामाया, श्री वीरभद्र, वेताळ, बारो, श्री ब्रह्मदुर्गा, क्षेत्रपाल, खुटी, श्री नारायणदेव, ग्रामपुरुष आणि श्री केळबाय, अशा इतर ग्रामदेवता आहेत. ही सर्व देवस्थाने शिरोड्याच्या पंचक्रोशीत असून या सर्व देवतांचे उत्सव ठराविक दिवशी होत असतात.
श्री शिवनाथ देवस्थानात निरनिराळे उत्सव होतात. त्यात प्रत्येक सोमवारी पालखी मिरवणूक, तसेच दसरा, नवरात्रोत्सव, रामनवमी, महाशिवरात्री, हे उत्सव होतात. मार्गशीर्ष मासातील शुक्ल चतुर्दशीपासून ६ दिवस जत्रोत्सव साजरा होतो.
वर्ष पद्धतीनुसार श्री शिवनाथदेवाचा जत्रोत्सव मार्गशीर्ष पौर्णिमा ते मार्गशीर्ष कृष्ण पक्ष पंचमीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनुसार साजरा होत आहे.
संकलक : सौ. सुविधा रमेश फडके, शिवनाथी, शिरोडा, गोवा.