यांत्रिक पद्धतीने (पर्ससीन) मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून ५ मास बंदी
नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई होणार
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – महाराष्ट्र सागरी अधिनियमातील अधिसूचनेनुसार १ जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ पर्यंत यांत्रिक पद्धतीने (पर्ससीन) मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आहे. याविषयीच्या अधिसूचनेची प्रत मच्छिमारी सहकारी संस्थेला देण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक पद्धतीने मासेमारीस पूर्णत: बंदी करण्यात आली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय साहाय्यक आयुक्त ना.वि. भादुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यांत्रिक पद्धतीने मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये नौका मूळ बंदरात किंवा अंमलबाजवणी अधिकारी विहीत करतील, अशा बंदरात ठेवण्यात येईल आणि अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे दावा नोंद करण्यात येईल. अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडील दाव्याचा निर्णय लागेपर्यंत नौका विभागाच्या कह्यात असेल, तथापि नौकेच्या संरक्षणाचे दायित्व संपूर्णपणे मालकांचे राहील.