दरोडा प्रकरणातील कोलवाळ कारागृहातील कैद्याला त्याच्या साथीदारांनी रुग्णालयातून पळवून नेले
कारागृह रक्षकांच्या डोळ्यांत मारला मीरपुडीचा फवारा
कारागृह रक्षकांपेक्षा कैदी हुशार आहेत, असे समजायचे का ?
`
पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) – दरोडा घातल्याप्रकरणी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयातून त्याच्या २ साथीदारांनी पळवून नेण्याची घटना ३० डिसेंबरला घडली. हा कैदी आग्रा येथील रहिवासी असून त्याचे नाव विवेक कुमार गौतम, असे आहे. २९ डिसेंबरच्या रात्री या कैद्याने त्याला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्याने त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्याची तपासणी झाल्यावर त्याला परत कारागृहात नेण्यासाठी कारागृह रक्षक प्रतीक्षा करत होते. त्या वेळी या कैद्याच्या २ साथीदारांनी कारागृह रक्षकांच्या डोळ्यांत मीरपुडीचा फवारा मारला आणि २ साथीदारांपैकी एकाने आणलेल्या मोटरसायकलवरून कैद्याला पळवून नेण्यात आले. या वेळी लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी या साथीदारांनी हवेत गोळीबार केला. घटनास्थळी पोलिसांना काडतुसे सापडली आहेत. या घटनेवरून कारागृहात भ्रमणभाषचा वापर बंदीवान करतात, असे मत सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत.