३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईअर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणार्यांवर तेथील वातावरणाचा झालेला नकारात्मक परिणाम
पाश्चात्त्यांच्या प्रथांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला, म्हणजे गुढीपाडव्याला भारतियांचे नववर्ष आरंभ होत असूनही भारतात गेल्या काही दशकांपासून ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत रूढ झाल्याचे सर्वत्र दिसून येते. समाजात ३१ डिसेंबरच्या रात्री एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन तेथे ‘न्यू ईअर पार्टी’, म्हणजे नववर्षाप्रीत्यर्थ मेजवानी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईअर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणार्यांवर तेथील वातावरणाचा आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत एकूण ११ साधक (३ भारतीय साधक आणि ८ विदेशी साधक) सहभागी झाले होते. त्यांपैकी ८ साधकांना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तर ३ साधकांना आध्यात्मिक त्रास नाही. आध्यात्मिक त्रास नसलेल्या ३ साधकांपैकी १ साधक ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा असून बाकी दोघांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प आहे. या प्रयोगांतर्गत चाचणीतील साधक पाश्चात्त्य संस्कृतीनुसार केशभूषा (हेअरस्टाईल), रंगभूषा (मेकअप) आणि वेशभूषा करून गोवा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आयोजित ‘न्यू ईअर पार्टी’मध्ये सहभागी झाले. तेथे हे सर्व साधक ५ घंटे होते. ३१.१२.२०१८ या रात्री पार्टीला जाण्यापूर्वी, तसेच १.१.२०१९ या दिवशी पहाटे पार्टीतून परतल्यानंतर त्या सर्वांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. पार्टीचा त्या सर्वांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – चाचणीतील सर्व साधकांवर पार्टीचा पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. पार्टीतून परतल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२. पार्टीतून परतल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांतील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली, त्यांच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
२. निष्कर्ष
‘न्यू ईअर पार्टी’चा चाचणीतील सर्व साधकांवर पुष्कळ नकारात्मक परिणाम झाला.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. चाचणीतील सर्व साधकांवर पार्टीचा पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे : आयोजकांचा ‘न्यू ईअर पार्टी’चे आयोजन करण्यामागील उद्देश ‘ग्राहकांना आकर्षित करून घेणे, त्यांचे मनोरंजन करणे आणि त्याद्वारे पुष्कळ पैसा कमावणे’, हा असतो. या अनुषंगाने तेथे पाश्चात्त्य पद्धतीचे नृत्य, संगीत, प्रकाशयोजना आदींची व्यवस्था केलेली असते, तसेच तेथे मांसाहारी पदार्थांसह मद्याचीही रेलचेल असते. या पार्टीला आलेले बहुतांश स्त्री-पुरुष असात्त्विक वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा केलेले असतात. एकंदरीतच तेथील वातावरण पुष्कळ असात्त्विक असते. साधक पार्टीला गेलेल्या हॉटेलमध्येही तसेच होते. असात्त्विक गोष्टींकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने आकृष्ट होणे स्वाभाविक आहे. पार्टीतील वातावरण जेवढे अधिक रज-तमयुक्त, तेवढे त्या ठिकाणी अधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने आकृष्ट होण्याची शक्यता वाढते. ‘न्यू ईअर पार्टी’च्या वेळी केलेल्या चाचणीतून याचाच प्रत्यय आला. पार्टीतील वातावरण अत्यधिक रज-तमयुक्त असल्याने चाचणीतील साधक केवळ ५ घंटे तेथे राहिल्यावर त्यांच्यावर नकारात्मक स्पंदनांचा परिणाम पुष्कळ प्रमाणात झाला. याविषयीचे विवरण पुढे दिले आहे.
३ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : व्यक्तीच्या देहाभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवले जाते. शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवली जाते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांमध्ये वाईट शक्तींच्या त्रासामुळे त्रासदायक शक्तीचे स्थान होते, तसेच त्यांच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरणही होते. पार्टीतून परतल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, पार्टीतील अत्यधिक रज-तमयुक्त वातावरणात काही घंटे वावरल्याने त्यांच्याभोवती असलेल्या त्रासदायक शक्तीच्या आवरणात पुष्कळ प्रमाणात वाढ झाली. पार्टीतील अत्यधिक रज-तमप्रधान वातावरणाच्या प्रभावामुळे त्यांच्या देहातील त्रासदायक शक्तीची स्थाने जागृत झाली. साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींना तेथील अत्यंत रज-तमयुक्त वातावरण पोषक ठरल्याने त्यांना तेथील त्रासदायक स्पंदने मोठ्या प्रमाणावर ग्रहण करणे आणि त्याचे प्रक्षेपण करणे सहज शक्य झाले.
३ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांतील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे, त्यांच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : या दोन्ही साधकांच्या देहाभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण काही प्रमाणात होते. त्यामुळे आरंभी त्यांच्यामध्ये अल्प प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली; पण त्यांच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. पार्टीतील रज-तमप्रधान वातावरणाचा परिणाम म्हणून दोन्ही साधकांच्या देहाभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण वाढले. त्यामुळे त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. या आवरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वापरली गेली; त्यामुळे ती नाहीशी झाली. थोडक्यात त्यांची साधना व्यय झाली. पार्टीतील रज-तमयुक्त वातावरणामुळे तेथे आकृष्ट झालेल्या वाईट शक्तींकडून वातावरणात पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदनांचे वेगवान प्रक्षेपण झाल्याने तेथील वातावरण अतिशय दूषित झाले. याचा परिणाम म्हणून दोन्ही साधकांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जाही आढळली.
३ आ. चाचणीतील काही साधक भारतीय होते, तर काही विदेशी होते; पण त्यांच्यावर झालेला नकारात्मक स्पंदनांचा परिणाम मात्र सारखाच होता.
३ इ. साधकांवरील नकारात्मक स्पंदनांचा परिणाम ४८ घंटे, म्हणजे २ दिवस टिकणे : चाचणीतील साधकांवर झालेला नकारात्मक स्पंदनांचा परिणाम दूर होण्यास तब्बल ४८ घंटे लागले. यातून अनेक वर्षे साधना करत असणार्या साधकांवर ते केवळ काही घंटे रज-तमप्रधान वातावरणात गेल्यावर एवढा हानीकारक परिणाम होत असेल, तर साधना न करणार्यांवर तो किती अधिक प्रमाणात होऊ शकतो, याची कल्पनाही करता येणार नाही.
थोडक्यात सांगायचे, तर ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित ‘न्यू ईअर पार्टी’ला जाणे अतिशय हानीकारक आहे, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१.२०१९)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भारतियांनो, पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करा !
‘हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा, अर्थात् गुढीपाडवा. ‘गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी’, असे शास्त्रात सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. १ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा वर्षारंभदिन आहे. गुढीपाडव्याला चालू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता चालू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला चालू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता चालू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर चालू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव व व्रते’) |