गांजाची झाडे लावण्यासंबंधीचा प्रस्ताव ‘स्वयंपूर्ण गोवा’चा भाग आहे का ? – गोवा फॉरवर्डचा खोचक प्रश्न
पणजी, २९ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यात व्यापारी तत्त्वावर गांजाची झाडे लावण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडून विचाराधीन आहे. अलीकडेच जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर शासन जनताविरोधी धोरणांचे समर्थन करत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.
ते म्हणाले, ‘‘सावंत यांचा स्वयंपूर्ण गोवा म्हणजे मारीजुना (गांजा) गोवा आहे का ? गांजाची लागवड करण्याचा प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांच्या स्वयंपूर्ण गोव्याविषयी आराखड्याचा भाग आहे का ? याऐवजी काहीतरी उपयोगी येणारे पीक घेण्यावर गोव्याने भर द्यावा. गांजाची लागवड ही औषधी उपयोगासाठी होईल, याविषयी शासन कशी खात्री देणार? आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे आवश्यक आहे का ? अशा प्रकारचे शासन आपण सत्तेत किती काळपर्यंत आणि कोणती किंमत देऊन ठेवणार आहोत ? असा गोव्यातील लोकांनी भविष्याविषयी विचार करावा. सावंत यांनी लोकांच्या आवश्यकता लक्षात घेऊन कोणत्याही गोष्टी प्राधान्याने कराव्या, हे कधीच ठरवलेले नाही. गोव्यात इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, फार्मसी कॉलेज आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था आहेत. आपला गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.’’