मालवण येथे स्कूबा व्यावसायिकांवर बंदर विभागाची धडक कारवाई
नियमांची पूर्तता न करता जलक्रीडा चालू असल्याने कारवाई ! – बंदर विभाग
मालवण – मालवण सागरी किनारपट्टीवर चिवला बिच आणि सिंधुदुर्ग किल्ला परिसरातील समुद्रात बंदर विभागाने मंगळवार, २९ डिसेंबरला ‘जलक्रीडा’ (स्कूबा) व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. या वेळी १२ व्यावसायिकांचे १२ सिलेंडर बंदर अधिकार्यांनी कह्यात घेतले आहेत, अशी माहिती कारवाई पथकातील बंदर अधिकारी अनंत गोसावी यांनी दिली.
ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे मालवण येथील समुद्रात काही जणांनी जलक्रीडा व्यवसाय चालू केले होते. त्यामुळे अचानक करण्यात आलेल्या कारवाईने जलक्रीडा व्यावसायिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
बंदर अधिकारी अनंत गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार बोट प्रवासी वाहतूक अनुज्ञप्ती, विमा, सर्वे सर्टिफिकेट आदी अनुज्ञप्त्या आणि नियमांची पूर्तता न करता, तसेच अनधिकृत व्यवसाय आणि लाईफ जॅकेट नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यावसायिकांनी सर्व अनुज्ञप्त्यांची पूर्तता करावी. नियमानुसार व्यवसाय करावा. या कारवाईत कह्यात घेण्यात आलेले सिलिंडर दंडात्मक कारवाईनंतर व्यावसायिकांना पुन्हा देण्यात येतील.