निवृत्ती महाराज वक्ते यांचे संपूर्ण जीवन अंतर्बाह्य पवित्र होते ! – ह.भ.प. (डॉ.) जयवंत बोधले महाराज

पंढरपूर येथे पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांच्या अस्थीकलशाचे पूजन

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ डिसेंबर (वार्ता.) – पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांचे संपूर्ण जीवन हे अंतर्बाह्य पवित्र होते. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात पुष्कळ मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे उद्गार ह.भ.प. (डॉ.) जयवंत महाराज बोधले यांनी काढले. ते पू. वक्ते महाराज यांच्या अस्थीकलश पूजन कार्यक्रमाच्या वेळी  बोलत होते. २१ डिसेंबर या दिवशी टाकळी हाट (जिल्हा बुलढाणा) येथे ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी देहत्याग केला.

पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांच्या अस्थीकलशाच्या पूजनाला उपस्थित महाराज मंडळी

१. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात त्यांनी आपल्या कीर्तन आणि प्रवचनांद्वारे, तसेच पंढरपुर येथे चातुर्मास कालावधीत ज्ञानदान करत. वारकरी संप्रदायाचे प्रचार-प्रसाराचे कार्य केल्याने सहस्रोंच्या संख्येने त्यांचा शिष्यवर्ग आहे. पंढरपूर स्थित परंपरागत फडकरी, मठाधिपती, हिंदुत्वनिष्ठ यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यामुळे त्यांचा अस्थीकलश श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शन आणि पूजन यांसाठी श्रीसंत मुक्ताबाई मठात आणण्यात आला होता. कलशाच्या पूजनानंतर त्यांच्या अस्थींचे श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून श्री पुंडलीक मंदिराजवळ चंद्रभागेच्या पात्रात विधीवत् विसर्जन करण्यात आले.

२. या वेळी अस्थीकलश पूजनासाठी आलेल्या मान्यवरांनी पू. वक्ते महाराजांचे वारकरी संप्रदायातील कार्य, धर्मपालन, पाखंड खंडण, प्रखर लेखणी आणि वक्तृत्व, अशा विविध आठवणींना उजाळा दिला. ‘त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच त्यांच्या चरणी खरी कृतज्ञता असेल’, असे मत उपस्थित मान्यवरांनी मांडले.

३. या वेळी ह.भ.प. बाळासाहेब महाराज बडवे, ह.भ.प. वीरेंद्रसिंह उत्पात, ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे, ह.भ.प. विठ्ठल महाराज नामदास, ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे यांसह वारकरी संप्रदाय पाईक संघ, वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना, राष्ट्रीय वारकरी परिषद, विश्व वारकरी सेना, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, पेशवा युवा मंच, हिंदु जनजागृती समिती, यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.