बांदा (सिंधुदुर्ग) येथील श्री बांदेश्वर-भूमिका देवतांचा जत्रोत्सव !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा हे निसर्गरम्य गाव. संस्थान काळात ‘बांदे’ असा उल्लेख असलेल्या या गावाचे संस्थानांच्या विलिनीकरणानंतर ‘बांदा’ असे नामकरण झाले. बांदा गावचे ग्रामदैवत श्री भूमिकादेवी आणि बांदावासियांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री देव बांदेश्वर यांचे आताचे मंदिर राजस्थानमधील ढोलपुरी गुलाबी रंगाच्या दगडांनी बांधलेले आहे. त्याच्यावर अतिशय सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. नूतन मंदिराचा कलशारोहण कोल्हापूर येथील करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आले होते. स्वयंभू श्री बांदेश्वर-भूमिका देवतांचा वार्षिक जत्रोत्सव ३० डिसेंबर २०२० या दिवशी होत आहे. त्यानिमित्ताने स्वयंभू श्री बांदेश्वर देवस्थानची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !
संकलक
श्री. चंद्रकांत शेटकर, बांदा, सिंधुदुर्ग
मंदिराचा इतिहास
वर्ष १५५० ते १५५३ च्या सुमारास नार जोग सावंत मोरया ही शिवभक्त व्यक्ती देवस्थान मर्यादाप्रमुख होती. तिला गुरे चरत असतांना आता जेथे श्री बांदेश्वर देवस्थान आहे, त्या ठिकाणी गच्च राईमध्ये गाय पान्हा सोडतांना दिसली. त्याने त्या ठिकाणी पाहिले असता, त्याला पिंडी दिसली. त्याने याविषयी तत्कालीन लोकांना दाखवले. राईची साफसफाई करून पिंडी मोकळी केली असता, त्या ठिकाणी ११ पूर्ण लिंगे आणि १ अर्धवट, अशी साडेअकरा लिंगे आत असल्याचे दिसून आले. १२ पूर्ण लिंगे असती, तर या ठिकाणाला काशी विश्वेश्वराचे महत्त्व प्राप्त झाले असते.
त्यावेळच्या कर्त्यापुरुषांनी स्थापत्य शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन ऊन, वारा, पाऊस, वीज, धरणीकंप यांपासून मंदिराला कोणताही धोका पोचू नये; म्हणून मंदिराचा घुमट आणि आतील भाग यांची चुना वापरून रचनात्मक बांधणी केली आहे. गाभार्याच्या प्रवेशद्वारावर ‘नार जोग सावंत मोरया’ हा शिलालेख कोरलेला आहे. तसे पाहिले, तर बांद्याचा इतिहास १२ व्या शतकापर्यंत जातो. ही ग्रामरचना मोडीलिपी चालू केलेल्या हेमाडपंत यांनी रचली. आजचे ग्रामदैवत श्री भूमिका आणि सर्व परिवार देवतांची मंदिरे ही आज ‘देवकोंड’ म्हणून जो भाग आहे, त्या ठिकाणी होती. आजही तेथे एक ब्राह्मण मंदिर आहे. स्वयंभू लिंग सापडल्यावर सर्व देवालये एकत्र असावीत, या उद्देशाने वर्ष १७५३ च्या सुमारास श्री भूमिकादेवी आणि इतर देवतांची मंदिरे आजच्या श्री बांदेश्वर मंदिराजवळ बांधण्यात आली आणि त्याला ‘श्री बांदेश्वर भूमिका पंचायतन’, असे संबोधण्यास प्रारंभ झाला.
देवस्थानचा कारभार
देवस्थानचा कारभार हा बारा-पाचचे मानकरी (म्हणजे ५ मानकरी आणि १२ बलुतेदार) पहातात. श्री देव बांदेश्वर मंदिरातील व्यवस्था ब्राह्मण पहातात, तर श्री माऊली पंचायतनमधील इतर व्यवस्था प्रमुख मर्याददार पहातात. ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमिती’, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या समितीची ‘श्री बांदेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती’ आहे.
प्रत्येक सोमवारी रात्री श्री बांदेश्वर मंदिरामध्ये भजन असते. जत्रेपासून मृग नक्षत्रापर्यंत श्रींची भजनाच्या जयघोषात पालखी काढली जाते. प्रत्येक सोमवारी पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम असणारे जवळच्या पंचक्रोशीतील हे एकमेव स्वयंभू मंदिर आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या ३ राज्यांमध्ये श्री देव बांदेश्वराचे भक्त विखुरलेले आहेत.
कौल लावण्याची पद्धत
देवस्थानाच्या संदर्भातील कौल श्री भूमिकादेवीच्या मंदिरात, तर भक्तगणांचे कौल श्री देव रवळनाथ मंदिरात लावले जातात. येथे ६५ तांदळांचे कौल लावण्याची पद्धत आहे. विनंतीप्रमाणे प्रत्येक कौलाचा अर्थ असतो.
मंदिरात साजरे होणारे अन्य धार्मिक कार्यक्रम
गुढीपाडवा, श्रीरामनवमी, हनुमान जयंती, देसरूढ, नारळी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, नरकचतुर्दशी, देवदिवाळी, महाशिवरात्र, होलिकोत्सव आदी उत्सव मंदिरात साजरे केले जातात.
यावर्षी ३० डिसेंबरला वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. दत्तजयंतीच्या दुसर्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा या तिथीला देवतांचा जत्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो. या दिवशी पहाटे भूमिकादेवीला स्नान घातले जाते आणि वस्त्रालंकारांनी देवीला सजवून देवीची पूजा केली जाते. प्रथम वरसलदारांकरवी देवीची ५ फळांनी ओटी भरली जाते. त्यानंतर माहेरवाशिणी, भाविक, देवीची ओटी भरतात. देवीला नवस बोलणे, नवस फेडणे इत्यादी कार्ये होतात. रात्री श्री बांदेश्वर-भूमिका देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. वर्षातून केवळ एकदाच जत्रोत्सवाच्या दिवशी या दोन्ही देवतांच्या मंदिरांभोवती एकत्रित प्रदक्षिणा होते. अन्य वेळी केवळ श्री बांदेश्वर मंदिराभोवती देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. रात्री दशावतारी नाट्यप्रयोग होतो. दुसर्या दिवशी सकाळी मंदिरात दहीकाला होतो. त्यानंतर देवता पालखीसह स्नानासाठी नदीवर जातात. नदीवरून पुन्हा मंदिरात येतांना मार्गात भाविक पालखीत धन, फळ, खाद्यपदार्थ इत्यादी अर्पण करतात. पालखी मंदिरात आल्यानंतर दुपारी समाराधनेने जत्रोत्सवाची सांगता होते.
श्री बांदेश्वर-भूमिका हे एक जागृत देवस्थान आहे. आपले प्रत्येक कार्य या देवतांच्या कृपेमुळेच तडीस जाते, अशी ग्रामवासियांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे ग्रामवासीय कोणत्याही नवीन उद्योगाचा अथवा कार्याचा प्रारंभ या देवतांना श्रीफळ अर्पण करून आणि देवतांना गार्हाणे घालून करतात.
सर्व ग्रामवासियांमध्ये राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होवो, हीच उत्सवाच्या निमित्ताने श्री बांदेश्वर-भूमिका देवतांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.
कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन
यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ‘उत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.