‘श्री गुरुसारिखा असता पाठीराखा’ या उक्तीची प्रचीती घेणारे पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
‘श्री गुरुसारिखा असता पाठीराखा’ या उक्तीची प्रचीती घेऊन अनेक प्राणघातक प्रसंगांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रक्षण झाल्याची अनुभूती घेणारे पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची इंग्रजी भाषेतील मार्गदर्शनाची ध्वनीमुद्रित केलेली ध्वनीचित्रफीत पहात होतो. त्यात त्यांनी ‘देवाने एका विदेशी साधिकेला प्राणघातक प्रसंगातून का वाचवले ?’, याविषयी मार्गदर्शन केले होते. ते म्हणाले, ‘‘ज्याच्यामध्ये साधना करून आध्यात्मिक उन्नती करायची क्षमता असते, त्याला देव वाचवतो.’’ हे ऐकल्यावर मला माझ्या आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जीवनातील जिवावर बेतलेले असे काही प्रसंग आठवले. ‘गुरुकृपेनेच आमचे त्या वेळी रक्षण झाले’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक जन्म आमच्या समवेत आहेत आणि ते सतत आमचे रक्षणही करतात’, असा भाव आता साधनेतून निर्माण झाला असल्याने ‘आम्हाला अनेक वेळा वाचवणारी गुरुमाऊलीच आहे’, यात काहीच शंका नाही. याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी अल्पच आहे.
१. विविध गंभीर प्रसंगांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने वाचणे
१ अ. लहानपणी उंचावरून पडल्याने डोक्याला मार लागून अस्थिभंग होणे, त्या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘पुढे काहीही त्रास होऊ शकतो’, असे सांगणे आणि गुरुमाऊलीनेच या प्रसंगात रक्षण केल्याचे जाणवणे : ‘मी ३ – ४ वर्षांचा असतांना एकदा उंचावरून पडलो होतो आणि माझ्या डोक्याला गंभीर मार लागून अस्थिभंगही झाला होता. त्या वेळी गोव्यात वैद्यकीय सुविधाही मोजक्याच होत्या. माझे वडील आधुनिक वैद्य होते. मला अस्पष्टसे आठवते, ‘त्यांनी मला दुसर्या एका आधुनिक वैद्याकडे नेले. माझ्या डोक्याला पट्टी बांधली होती. मी काही दिवस शाळेत जाऊ शकलो नव्हतो.’ बाकीचे मला काही आठवत नाही. मी मोठा झाल्यावर एकदा आईने मला सांगितले, ‘‘आधुनिक वैद्य म्हणाले होते, ‘‘या मुलाचे पुढे काहीही होऊ शकते. तो मंदबुद्धीचा किंवा वेडाही होऊ शकतो.’’ आधुनिक वैद्य म्हणाले, त्याप्रमाणे काही झाले नाही. मला याच जन्मात साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करायची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील पहिलाच मोठा अपघात होता आणि त्यात नि:संंशय गुरुमाऊलीने माझे रक्षण केले.
१ आ. आस्थापनातील सहकार्यांसमवेत सहलीसाठी समुद्रावर जाणे आणि समुद्रात स्नान करतांना समुद्राच्या पाण्यात ओढले जाणे, त्या वेळी पुष्कळ प्रयत्न करून किनार्यावर येणे आणि गुरुकृपेनेच संकटातून रक्षण झाल्याचे जाणवणे : मी नोकरी करत असतांना (तेव्हा साधना चालू झाली नव्हती) आस्थापनातील कर्मचार्यांची एक वार्षिक सहल होती. आम्ही समुद्र किनार्यावर सहलीला गेलो. आम्ही बरेच जण समुद्रात स्नान करायला गेलो. त्या वेळी एक उलटी लाट येऊन मी समुद्राच्या खोल पाण्यात ओढलो गेलो. त्यामुळे किनारा दूर राहिला. बराच वेळ जिवाच्या आकांताने प्रयत्न करून मी किनारा गाठला आणि समवेतच्या एका व्यक्तीलाही बुडण्यापासून वाचवले. आता वाटते, ‘केवळ गुरुकृपेनेच मला त्या वेळी शक्ती मिळाली आणि त्या संकटातून माझे रक्षण झाले.’
१ इ. विद्युत यंत्रातील बिघाड पहातांना उच्च दाबाची वीज वाहून नेणार्या तारेचा स्पर्श होऊन फेकला जाणे, काही काळ अस्पष्ट दिसणे आणि गुरुकृपेनेच रक्षण होऊन कुठलीही जखम न होणे : एकदा माझी सायंकाळची शिफ्ट होती. एका विद्युत यंत्रातील काही बिघाड पहातांना मला उच्च दाबाची वीज वाहून नेणार्या तारेचा स्पर्श झाला आणि मला मोठा झटका बसला. त्या झटक्याने मी थोडा दूर फेकलो गेलो. विजेच्या (स्पार्क) ज्वाळांमुळे डोळ्यांसमोर संपूर्ण अंधार होऊन मला काही दिसेनासे झाले. त्या वेळी मला वाटले, ‘माझी दृष्टी गेली असावी.’ तिथे साहाय्य करायला कुणीही नव्हते. मी एकटाच होतो. मी काही वेळाने भानावर आलो आणि मला अस्पष्ट दिसायला लागले. मला काही वेळाने स्पष्ट दिसायला लागले. यापूर्वी त्याच जागी एका कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. गुरुकृपेनेच माझे रक्षण झाले आणि मला कुठलीही इजा झाली नाही.
१ ई. अनेक वेळा दुचाकीवरून पडून जिवावर बेतणारे प्रसंग निर्माण होऊनही अशा प्रसंगांत काहीही न होणे आणि ‘रक्षण करणारे परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, असे जाणवणे : मी दुचाकी चालवायला लागल्यापासून आणि साधनेला आरंभ करण्यापूर्वी दुचाकीवरून अनेक वेगवेगळ्या प्रसंगी पडलो आहे. यातील काही प्रसंग अत्यंत जिवावर बेतणारे किंवा मोठी हानी होणारे होते. त्या वेळी मला प्रश्न पडायचा, ‘मला काही झाले कसे नाही ? थोडक्यात कसे निभावून गेले ?’ अशा अनेक प्रसंगी ‘माझे रक्षण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे मला जाणवायचे.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ समवेत असतांना अपघाताचे अनेक प्रसंग घडूनही त्यातून वाचणे आणि परात्पर गुरुदेवांनी जीविताचे रक्षण केल्याचे जाणवणे
२ अ. समोरून भरधाव वेगाने ट्रक येऊनही जीवघेण्या अपघातापासून रक्षण होणे आणि त्याआधी गाडी बंद पडून भगवंताने संकटाची वेळ टाळल्याचे जाणवणे : वर्ष १९९६ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गर्भवती असतांना एकदा त्यांची वैद्यकीय तपासणी करून आम्ही पणजी ते फोंडा चारचाकीने प्रवास करत होतो. आमच्या समवेत माझे वडीलही होते. मी चारचाकी चालवत होतो. ओल्ड गोवा येथे पोचण्यापूर्वी एक स्थानदेवतेचे जागृत मंदिर आहे. त्या ठिकाणी आमची चारचाकी आपोआपच बंद पडली आणि ‘चालू होत नाही’, असे झाले; पण २ – ३ मिनिटांनी चारचाकी चालू झाली. पुढे ओल्ड गोवा सर्कल (चौक) या ठिकाणी आम्ही पोचत असतांना एक मोठा ट्रक समोरून भरधाव वेगाने काही वाहने आणि लोक यांना तुडवून येत असतांना दिसला. त्यानंतर तो ट्रक सरळ आमच्या दिशेने येत होता. मी चारचाकी जागीच थांबवली; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ट्रक आमच्या जवळ पोचण्याच्या काही क्षणांपूर्वी ढकलून बाहेरच्या बाजूने गेल्याचे जाणवले आणि आम्ही मोठ्या अपघातातून वाचलो. ट्रकने एका मोठ्या झाडाला धडक दिली. नंतर पाहिले असता ट्रकच्या धडकेमुळे अन्य वाहनांची नासधूस झाली होती आणि काही जण जागीच मृत्यू पावले होते. ‘काही वेळ आमची चारचाकी बंद का पडली ?’, याचा विचार केल्यावर वाटले, ‘भगवंताने संकटाची वेळ टाळली होती.’ वर्ष १९९६ मध्ये आम्ही साधनेला आरंभ केला होता. ही अनुभूती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना लिहून पाठवली आणि याविषयी मार्गदर्शनाचे पत्र त्यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाठवले होते. आम्ही हे पत्र अजूनही सांभाळून ठेवले आहे. त्या वेळी केवळ गुरुकृपेनेच आमचे रक्षण झाले.
२ आ. वैद्यकीय तपासणी करून परत येतांना अकस्मात् चारचाकीवरचे नियंत्रण जाणे, रहदारीचा मार्ग असूनही मार्गात कुणीच नसल्याने पुढील अनर्थ टळणे आणि देवानेच रक्षणासाठी ही परिस्थिती निर्माण केल्याचे जाणवणे : एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वैद्यकीय तपासणी करून मी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पणजी ते फोंडा असा चारचाकी वाहनातून प्रवास करत होतो. मी चारचाकी चालवत होतो. आम्ही रायबंदर येथे पोचल्यावर अकस्मात् माझे चारचाकीवरचे नियंत्रण गेले आणि ती जोरात एका बाजूला घसरत गेली. मी खाली उतरून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘चारचाकीचे पुढचे एक चाक निसटून दूर पडले होते आणि चारचाकी तीन चाकांवर घसरत गेली होती.’ हे ज्या ठिकाणी घडले, तो मार्ग पूर्ण रहदारीचा आणि सतत वाहनांची ये-जा असणारा आहे; मात्र आमच्या चारचाकीचा अपघात झाला, त्या वेळी एकही माणूस किंवा वाहन मार्गातून जात नव्हते. ‘जणू देवाने सर्व वाहने आमच्या रक्षणासाठी काही वेळ थांबवली होती’, असे आम्हाला वाटले. काही वेळाने चारचाकीची दुरुस्ती करायला एक माणूसही भेटला आणि चारचाकी घरी आणता आली.
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गर्भवती असतांना त्यांना विजेचा धक्का बसणे, तसेच देवदर्शनाला जातांना त्या तोल जाऊन पडणे; परंतु दोन्ही प्रसंगात त्यांचे आणि गर्भाचेही रक्षण होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सात मासांच्या गर्भवती असतांना आमच्या मूळ गावी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. (गोव्यात याला ‘फुलां’ असे म्हणतात.) त्या वेळी त्यांनी घातलेल्या फुलांच्या वेणीला रूपेरी नक्षी होती. (गोव्यात याला ‘फाती’ असे म्हणतात.) त्या रूपेरी नक्षीचा एक धागा विजेच्या बटनाच्या फटीतून आत गेला आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना विजेचा धक्का बसला. त्या वेळी काही अनर्थ झाला नाही आणि गर्भाचेही रक्षण झाले. त्याच दरम्यान आम्ही एकदा ग्रामदेवता श्री अनंतदेवाच्या दर्शनाला जातांना सौ. बिंदा पायर्यांवर अकस्मात् तोल जाऊन पडल्या; पण त्याही वेळी काही अनर्थ झाला नाही आणि गर्भाचेही रक्षण झाले. केवळ गुरुकृपेनेच त्यांचे रक्षण झाले.
२ ई. चारचाकीतून प्रवास करतांना चारचाकीवरचे नियंत्रण गेल्याने चारचाकी ट्रकला धडकून थांबणे आणि चारचाकीची थोडी हानी होऊनही सुखरूपपणे घरी पोचणे : एकदा आम्ही रात्री चारचाकीतून पणजी ते फोंडा असा प्रवास करत होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते. मी चारचाकी चालवत होतो आणि समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि मुलगा सोहम् होता. कुंडई येथे एक मोठे धोकादायक वळण आहे. त्या ठिकाणी मार्गात बरेच तेल सांडले होते. त्यावर चारचाकी घसरून माझे चारचाकीवरचे नियंत्रण गेले आणि काही अंतरावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर आमची चारचाकी धडकली आणि तिथेच थांबली. चारचाकीच्या पुढच्या भागाची काही प्रमाणात नासधूस झाली, तरी ती चालू स्थितीत होती; म्हणून आम्ही सुखरूप घरी पोचलो. त्या वेळी त्या ठिकाणी कुणीही नव्हते आणि गुरुकृपेनेच आमचे रक्षण झाले.
३. कृतज्ञता
‘हे संकलित केलेले काही ज्ञात प्रसंग आहेत. ‘अशा किती ज्ञात आणि अज्ञात प्रसंगी आमचे गुरुकृपेने रक्षण झाले’, हे सांगणेही कठीण आहे. असे केवळ आमच्याच बाबतीत घडले नसून श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊलीने अनेक साधकांचे क्षणोक्षणी रक्षण केलेच आहे. ज्यांनी अनेक प्रसंगी आमचे रक्षण केले आणि ज्यांच्या कृपेने आम्हाला साधनेची अमूल्य संधी मिळाली, असे प्रीतीस्वरूप, कृपावंत आणि करुणासिंधु गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी (३१.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |