३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी पोलीस ठाणे आणि नगरपरिषद येथे निवेदन
हुपरी (जिल्हा कोल्हापूर), २९ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपान, धूम्रपान आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने हुपरी पोलीस ठाणे आणि नगरपरिषद येथे २८ डिसेंबर या दिवशी देण्यात आले. पोलीस ठाण्यात हवालदार विशाल चौगुले, तर हुपरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी हे निवेदन स्वीकारले.
या वेळी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे शहराध्यक्ष नितीन काकडे, श्री सद्गुरु सेवा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विशाल सरवदे, भाजपचे प्रदीप मिरजकर, भगवा रक्षकचे महादेव पाटील आणि उमाजी पाटील, धर्मप्रेमी श्री. अविनाश वाडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर, तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात धारावी, मुंबई पोलीस ठाण्यात निवेदन
मुंबई – २६ डिसेंबर या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांना निवेदन देण्यात आले. ३१ डिसेंबरच्या दिवशी नववर्षारंभाच्या नावाखाली गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंद वालावलकर, श्री. कांतीलाल पटेल, श्री. विमल जैन हे उपस्थित होते.
अंबड (जिल्हा जालना) येथे पोलिसांना निवेदन !
अंबड (जिल्हा जालना) – येथे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभच्या नावाखाली सार्वजनिक आणि ऐतिहासिक ठिकाणी होणार्या अपप्रकाराला आळा घालावा यासाठी अंबड येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नांदेडकर यांनी निवेदन स्वीकारतांना सांगितले की, कोणी अपप्रकार करणार नाही. शासनाचे तसे आदेशच आहेत. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आहे.
या वेळी समितीचे सर्वश्री रवींद्र अंबिलवादे, अथर्व देशमुख, दत्तात्रेय हरणे, शिवाजी घोडके उपस्थित होते.