ब्रिटनहून पुण्यात आलेले १०९ प्रवासी बेपत्ता

शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव

पुणे – इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती. त्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांचा समावेश आहे. पुण्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते आणि संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याचे यात सांगण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आश्‍विन भारती यांनी याविषयी पोलिसांना पत्र दिले आहे.

कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आल्याने राज्यशासनाने परदेशातून विशेषत: इंग्लंडहून १ डिसेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची पडताळणी करावी आणि त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली, तर त्यांना इतरांपासून विलग करून लगेच रुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले आहेत.