नागरिकांना नववर्षांचे स्वागत करायला द्यावे, यासाठी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती !
पाश्चात्त्य नववर्षाच्या नावाखाली चालणारे अपप्रकार सर्वांनाच माहीत आहेत. अशा प्रकारांना प्रोत्साहन देण्याऐवजी ‘हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करावे’, असे आवाहन मनसेने केले असते, तर ते मराठी माणसाला अधिक रुचले असते. हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्या मनसेकडून हिंदु समाजाला अशी अपेक्षा आहे.
मुंबई – ‘वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, आता १ दिवस आमचे ऐका. नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या’, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने महानगरपालिकाक्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी घोषित केली आहे. याविषयी संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, नववर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्वागताच्या पार्ट्या होत असतात. त्यामुळे ३१ डिसेंबरला १ दिवस लोकांवरील निर्बंध शिथिल करण्यात यावेत. (हिंदु संस्कृतीने चांगल्या गोष्टींचा नेहमीच अंगिकार केला आहे, मग त्या पाश्चात्त्यांच्या का असोत. पाश्चात्त्य नववर्ष संस्कृतीला नव्हे; तर चंगळवादाला प्रोत्साहन देते. त्यामुळे आपल्या भावी पिढीपुढे या व्यभिचाराचा आदर्श ठेवायचा ? कि महान हिंदु संस्कृतीचा याचा विचार हिंदूंनी करावा. – संपादक)