दत्त हाच खरा मोक्षगुरु
‘शांती आणि वैराग्य हे अध्यात्मातील दोन टप्पे दत्ताच्या कृपाशीर्वादाविना पूर्णत्वाला जाऊच शकत नाहीत; म्हणून श्री दत्त हाच खरा मोक्षगुरु ठरतो आणि त्याचा जयजयकार ‘श्री गुरुदेव दत्त’ असाच सर्वत्र केला जातो. दत्त याचा अर्थ निर्गुणाची अनुभूती ज्याने घेतली आहे’, असा आहे. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे, असा.
दत्त या शब्दाचा अर्थ
दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.
अखंड शिष्यभावात असणे
भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत ‘शिष्य अवस्थेत’ वावरतात. ‘शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.’ शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. ‘आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला’, हे यांत अवधूत यांनी सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी २४ गुरु आणि २४ उपगुरु केले. ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात.
वैराग्य आणि संन्यस्थ
भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते ‘’स्वेच्छाविहारी’’ आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेनेच मिळते.
दत्ताचे अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार होय. तसेच माणिकप्रभु’ तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत.
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘दत्त’
सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो, अशी श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना !