३१ डिसेंबरला गडकोट, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, ‘पार्ट्या’ करणे यांना प्रतिबंध करा !
धर्मप्रेमींचे पन्हाळा नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला असून अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. या महामारीच्या काळात फटाके फोडल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढून श्वसनाचे त्रास वाढतात. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक ‘सेलिब्रेशन’वर बंदी घालावी. येत्या ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, ‘पार्ट्या’ करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे यांस प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने धर्मप्रेमींच्या वतीने २८ डिसेंबर या दिवशी पन्हाळा नायब तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे यांना देण्यात आले.
या वेळी केर्ले (तालुका – करवीर) येथील सर्वश्री रामभाऊ मेथे, अमोल गुरव, अविनाश पोवार, अक्षय बुवा, केवल भोसले, मंगेश गोळे, पन्हाळा येथील शिवसेनेचे श्री. मारुति माने, श्री. अभय वाईंगडे, बजरंग दलाचे श्री. ऋषि चौगुले पोर्ले, सर्वश्री महादेव साळुंखे, श्रीपाद रंगापुरे, राहुल साळोखे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक ए.डी. फडतरे यांनी सविस्तर विषय ऐकून ‘‘मी सर्वच उत्सवांसाठी चोख बंदोबस्त ठेवतो, तसा यंदाही ठेवणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न असतात. बंदोबस्ताच्या संदर्भात काही सूचना असल्यास अवश्य कळवा’’, असे मत व्यक्त केले.