दत्तात्रेयांची कथा
‘अनसूया महान पतिव्रता आहे. ती ध्यान करते. जप करते. अभिमंत्रित जल घेते. तिन्ही देवांच्या अंगांवर पाणी शिंपडते. तिघे देव बालक होतात. पतिव्रत्याची, परमपावित्र्याची आणि तपस्येची ही ताकद आहे.
इकडे पार्वती विचार करते, ‘शिवशंकर पहाटे गेले अनसूयेच्या आश्रमात. संध्याकाळ झाली. अजून कसे आले नाहीत ?’ ती पतीला शोधायला निघते. लक्ष्मी आणि सरस्वती देवीही निघतात.
नारद चित्रकूट पर्वतावर आहेत. तिघी नारदाकडे जातात. नारद ध्यानस्थ असतात. अनुष्ठानात असतात. त्या तिघी पतींची चौकशी करतात. नारद सांगतात, ‘‘आधी सांगा की, तुम्ही थोर का अनसूया ?’’
तिघी देवी सांगतात, ‘‘अनसूया थोर; पण आमचे पतीदेव कुठे आहेत ?’’ नारद सांगतात, ‘‘तुमचे पती देव बालक बनलेले आहेत. अनसूयेच्या घरी ते आहेत.’’ तिघी देवी लटपटतात, थरथरतात. असूया करणारा भयभीत होतोच. त्याला शांती लाभूच शकत नाही. ‘आम्ही गेलो आणि अनसूयेने शाप दिला तर ?’
नारद म्हणतात, ‘तुम्ही भलेही मत्सरी असा; पण अनसूया ही असूयारहित आहे. तिचा भाव पवित्र आहे, परम मित्रत्वाचा आहे. परम प्रेमाचा आहे.’ तिघी देवी अनसूयेच्या आश्रमात येतात ! अनसूयेने तिन्ही देवांकडून अनेक वचने घेतली, प्रतिज्ञा करवून घेतल्या. ‘आजपासून पतिव्रतेला कोणतीही पीडा देणार नाही. विश्वातील कोणत्याही स्त्रीला कष्ट देणार नाही.’
तेवढ्यातच अत्रिऋषि येतात. ती ३ बालके त्यांना दिसतात. अनसूया त्यांना सांगते, ‘‘हे तिघे माझी (माझे) बालके (बालक) आहेत. या तिघी या तीन बालकांच्या स्त्रिया आहेत.’’ अत्रिऋषि म्हणतात, ‘‘ही तीन बालके नाहीत. श्रेष्ठ देव आहेत.’’ अत्री कमंडलूतील अभिमंत्रित जलसिंचन करतात. तिन्ही देव प्रकटतात. तिघे अनसूयेला वर देतात, ‘‘तुझ्या अंगणात आम्ही तुझी बालके होऊन खेळलो. तेच सुख आम्ही तुला देतो.’’ तिघे देव एक झाले. दत्तात्रेय अवतरले.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’ मार्च २०१२)
सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो, अशी श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना !