३१ डिसेंबर साजरा न करण्याच्या निमगाव ग्रामस्थांच्या या निर्धाराचे ग्रामपंचायतीकडून कौतुक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या अपप्रकारांविरोधात जळगाव जिल्ह्यात जनजागृतीपर अभियान !
जळगाव, २७ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून निमगाव (यावल) येथील धर्मप्रेमी ग्रामस्थांनी गावातून ३१ डिसेंबरची विकृती हद्दपार करण्याचा निर्धार केला. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या निर्धाराचे कौतुक केले.
समितीच्या वतीने जिल्ह्यात चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, धरणगाव, एरंडोल येथे ऑनलाईन बैठका आणि प्रवचने घेऊन जागृती करण्यात आली. तसेच यावल, धरणगाव, पाळधी, अमळनेर, एरंडोल, चोपडा, सावदा, वरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निमगाव – मागील वर्षी खर्ची (एरंडोल) येथील ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीद्वारे गावात ‘३१ डिसेंबर’ साजरे न करण्याविषयी ठराव पारित केला होता. तशीच अभिनंदनीय कृती या वर्षी निमगाव ग्रामस्थांनी केली आहे. येथील धर्मप्रेमी श्री. सूरज पाटील यांनी यात पुढाकार घेतला. (असे धर्मप्रेमी हीच हिंदूंची खरी शक्ती ! – संपादक)
अन्य गावांतील हिंदूंनीही याचा आदर्श घेऊन पाश्चात्य संस्कृतीला हद्दपार करून हिंदु धर्मानुसार आचरण करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. |