हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ऑनलाईन तीन दिवसीय प्रथमोपचार शिबीर पार पडले !
जळगाव, २६ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ते २० डिसेंबर या कालावधीत ३ दिवसीय प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी करावयाच्या कृती, भाजणे आणि पोळणे, विजेचा धक्का लागणे, वीज कोसळणे आदी प्रसंगात नेमकी कोणती काळजी घ्यावी ? श्वसनमार्गामध्ये आगंतुक वस्तू अडकल्यास ती बाहेर कशी काढावी ? पोटावर पडलेल्या बेशुद्ध रुग्णाला सरळ म्हणजे पाठीवर कसे झोपवावे ? अशा प्रात्यक्षिक विषयांवर तज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. चित्रे आणि व्हिडिओ दाखवून विषय सुस्पष्ट करण्यात आला. शिबिराचा जिल्ह्यातील ६० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
डॉ. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. (श्रीमती) नटावदकर, सौ. सुनीता व्यास, सौ. मीनाक्षी पाटील, सौ. विनया जोशी, सौ. नीलिमा नेवे, सौ. निवेदिता जोशी, डॉ. जागृती गुलाठी यांनी उपरोक्त विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिरात जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला. ‘असे शिबीर गावोगावी आयोजित करायला हवे’, ‘३ दिवसीय शिबिरामध्ये पुष्कळ चांगली माहिती मिळाली’, अशा प्रतिक्रिया शिबिरानंतर प्राप्त झाल्या.