चिनी प्रवाशांना भारतात आणू नये ! – भारत सरकारचा विमान आस्थापनांना आदेश

चीनने भारतीय प्रवाशांविषयी असाच निर्णय घेतल्याने भारताचे प्रत्युत्तर !

नवी देहली – भारत सरकारने ‘चिनी प्रवाशांना भारतात आणू नये’, असे अनौपचारिक निर्देश सर्व विमान वाहतूक आस्थापनांना दिले आहेत. नोव्हेंबर मासात चीनकडून भारतीय प्रवाशांच्या संदर्भात असाच निर्णय घेण्यात आल्याने भारताला त्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. (भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! – संपादक)

चीनने अनुमती देण्यास नकार दिल्यामुळे विविध चिनी बंदरांवर मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अडकले आहेत. एवढेच नाही, तर चालक बदली करण्यासही नकार दिला जात आहे. यामुळे जहाजांवर कार्यरत असलेल्या जवळपास १ सहस्र ५०० भारतियांना याचा फटका बसला आहे; कारण ते घरी परतण्यास असमर्थ आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. (या भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक)