कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
‘आधी काश्मीर कह्यात घेऊ, मग भारतात घुसून त्याचा ताबा घेऊ’, असे विधान केल्याचा सिंधुदुर्गात निषेध
सावंतवाडी – ‘आधी काश्मीर कह्यात घेऊ, मग भारतात घुसून त्याचा ताबा घेऊ’, अशा प्रकारचे वादग्रस्त विधान पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. त्याच्या या कृत्याचा निषेध म्हणून २७ डिसेंबरला भाजपचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष संदेश बिडये यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते आणि कलंबिस्त पंचक्रोशीतील हिंदू यांनी एकत्र येत कलंबिस्त मळा येथे ‘शोएब अख्तर’च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी उपस्थितांनी ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’, अशा घोषणा दिल्या.
शोएब अख्तरच्या वक्तव्याविषयीचे वृत्त २५ डिसेंबर २०२० या दिवशी दैनिक ‘तरुण भारत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तानुसार शोएब अख्तर याने म्हटले आहे की, अफगाणिस्तानातून इस्लामी आतंकवादी प्रथम काश्मीरवर आक्रमण करतील. काश्मीर कह्यात घेतल्यानंतर ते भारतात घुसतील. भारतातील हिंदूंशी लढाई करून ते हिंदूंचा पराभव करतील आणि भारतात इस्लामी राज्य स्थापन करतील. आमच्या धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे की, ‘गझवा-ए-हिंद’ नक्कीच घडेल. (भारतातील हिंदू आता जागृत होत असल्याने धर्मांधांनी भारतावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे ! इस्लामी राज्य दूरच, उलट कालमहात्म्याप्रमाणे भारतात सात्त्विक आणि सज्जन व्यक्तींचे हिंदु राष्ट्र स्थापन होणार असल्याचे त्यांनी जाणावे, यातच अख्तर यांच्यासारख्यांचे भले आहे ! – संपादक) केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर उझबेकिस्तान आणि इतर इस्लामी देशांमधून आतंकवाद्यांचे गट भारतावर आक्रमण करतील, असे त्याने म्हटले आहे. (भारत त्याच्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ आहे ! आतापर्यंत अनेक वेळा भारतीय सेनादलांकडून मार खाऊनही पाकिस्तानी भारतावर राज्य करण्याचे मनसुबे रचत आहेत, हाच मोठा विनोद आहे ! – संपादक)