भगवद्गीतेतील मार्गदर्शन आजही उपयुक्त ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
फरीदाबाद (हरियाणा) – तणावपूर्ण जीवनशैलीमधून बाहेर येण्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेले मार्गदर्शन आजही तेवढेच उपयुक्त आहे. सध्याची समाजव्यवस्था व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करणारी आहे. त्यामुळे प्रत्येक जण जीवनातील तणाव न्यून करण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशा स्थितीत आपल्या दोषांवर मात करण्यासह समाजातील दृष्ट प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करणे, तणाव निर्मूलनासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय गीता जयंती महोत्सवानिमित्त हरियाणातील प्रसिद्ध सी. बोस विद्यापिठाच्या वतीनेे एका ५ दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘गीतेचे श्लोक पठण करणे चांगली गोष्ट आहे; परंतु गीतचे ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणले, तर त्याचा आपल्याला खर्या अर्थाने लाभ होऊ शकतो. त्यामुळे गीता समजणे आणि जीवनात तिचे आचरण करणे आवश्यक आहे.’’
क्षणचित्रे
१. प्रवचन संंपल्यानंतर आयोजक प्राध्यापकांनी दूरभाष करून हिंदु जनजागृती समितीविषयी जाणून घेतले.
२. हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या निष्काम कार्याने बालाजी एज्युकेशन ट्रस्टचे संचालक डॉ. जगदीश चौधरी प्रभावित झाले. त्यांचे या प्रवचनाच्या आयोजनासाठी सहकार्य लाभले.