शास्त्रानुसार साधना न केल्याने साधिकेच्या कुटुंबियांना आलेल्या अनेक अडचणी !
‘साधना न केल्याने किंवा साधना शास्त्रानुसार न करता चुका केल्याने माझ्या कुटुंबियांची स्थिती दयनीय झाली आहे. वडिलांचा स्वभाव पुष्कळ रागीट असल्याने इतरांनी ऐकले नाही की, त्यांचा अहं दुखावतो. ‘मी म्हणतो तेच योग्य आहे’, अशी आग्रही भूमिका असल्याने त्यांची आईही त्यांना घाबरायची.
१. गणपतीची मूर्ती विसर्जित न करता प्रत्येक वर्षी त्याच मूर्तीची पूजा करणे आणि चुलत बहिणीच्या लग्नात अडचणी आल्यावर काकीने गणपतीची नवीन मूर्ती आणण्यास प्रारंभ करायला सांगणे : वडील आणि वडिलांचे भाऊ यांचे काही कारणावरून भांडण झाले. त्या वेळी त्यांचे भाऊ घर सोडून मुंबईला गेले. त्या वर्षापासून वडिलांनी स्वतःच्या मनाने गणेशोत्सवात गणपति न बसवता मातीची शिवपिंड स्वतः सिद्ध करून तिची पूजा करायला आरंभ केला. घरात गणपतीची एक मूर्ती होती. ती मूर्ती पूजेत ठेवून ते तिची पूजा करायचे आणि पुन्हा पुढच्या वर्षासाठी तीच मूर्ती ठेवायचे. ‘प्रत्येक सण शास्त्रानुसार साजरा केल्यावर त्याचा घरातील व्यक्तींना लाभ होतो’, हा विचार न करता त्यांनी चुकीची कृती केली. त्यामुळे घरातील व्यक्तींना मनःशांती मिळाली नाही. असे १२ वर्षे चालू होते. १२ वर्षांनी काकीने त्यांच्या मुलींच्या लग्नात अडचणी येत असल्याने गणपतीची मूर्ती नवीन आणायला आरंभ करायला सांगितले.
२. नोकरीच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगामुळे मनावर परिणाम होऊन वडिलांनी काही काळ नोकरीवर जाणे बंद करणे : त्या वेळी माझा जन्म झालेला नव्हता. तीन भावंडे माझ्याहून मोठी आहेत. वडील शासकीय नोकरी करत होते. एक दिवस ते टेम्पोतून प्रवास करत होते. घाटातील दरीत टेम्पो पडणार होता. ‘आता टेम्पो दरीत पडणार’, असे कळल्यावर त्यांच्या मनावर परिणाम झाला. प्रत्यक्षात टेम्पो दरीत कोसळला नाही. ‘चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटत आहेे’, हे पाहूनच ते घाबरले. त्या दिवसापासून त्यांनी नोकरीवर जायचे बंद केले. २ वर्षे ते नोकरीवर गेले नाहीत. शासकीय लोक त्यांना न्यायला यायचे. त्यानंतर त्यांनी कामावर जाणे चालू केले.
३. आईचे दागिने अधिकोषात ठेवून वडिलांनी घर बांधणे, भाडेकरूच्या भाड्याचे पैसे भावाने घेतल्याने वडिलांना आईचे दागिने सोडवता न येणे आणि त्यामुळे आईच्या मनावर परिणाम होऊन तिला मनोरुग्णालयात भरती करावी लागणे : आईच्या माहेरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे आजोबांनी तिला पुष्कळ दागिने दिले होते. घर बांधण्यासाठी पैसे हवे होते; म्हणून ते दागिने वडिलांनी अधिकोषात ठेवले. वडिलांनी मोठे घर बांधले आणि त्या घरात भाडेकरू ठेवले. येणार्या भाड्याचे सर्व पैसे वडिलांच्या भावाने घेतले. त्यामुळे त्यांना दागिने सोडवता आले नाहीत. वडिलांना पगार अल्प असल्याने पैसे पुरत नव्हते. त्याचा ताण येऊन आईच्या मनावर परिणाम झाला आणि तिला मनोरुग्णालयात भरती करावे लागले. काही मास (महिने) तिला शॉक देण्याचा उपाय करावा लागला.
४. आईच्या माहेरी रहात असतांना मामाने घरातून बाहेर काढणे आणि ओळखीच्या व्यक्तीने रहाण्यास खोली देणे : नोकरीनिमित्त बाहेरगावी गेल्यावर वडिलांकडे भाड्याने घर घेण्यासाठीही पैसे नव्हते. आईच्या माहेरी एका खोलीत रहात असतांना एक दिवस मामाने आम्हाला खोलीतून बाहेर काढले आणि खोलीला कुलूप लावले. त्या दिवशी समाजातील एका ओळखीच्या व्यक्तीने रहाण्यासाठी खोली दिली. स्वतःच्या भावाने बहिणीला घरातून बाहेर काढले. यावरून कठीण प्रसंगात नातेवाइक नाही, तर थोड्याशा पुण्याईवर देवाने साहाय्य केले.
५. ‘शिक्षण आणि पैसा यांविना समाजात मान नाही’, असे संस्कार मनावर झाल्याने साधनेचा योग्य मार्ग न सापडणे : मी ५ वर्षांची होते. घरात सतत तणावाचे वातावरण असायचे. माझ्या मनात सतत विचार यायचा, ‘या स्थितीतून आम्ही कधी बाहेर पडणार ?’ वडिलांनी ‘शिक्षण आणि पैसा यांविना तुम्हाला समाजात मान नाही’, हा संस्कार आमच्या मनावर केल्यामुळे ‘संस्कृतीनुसार कसे वागायचे ?’, ते शिकवले नाही. वडील देवपूजा करायचे; परंतु ती मनापासून योग्य पद्धतीने न करता मनाने केली जात होती. मला घरची परिस्थिती अतिशय गंभीर वाटत होती. ‘या परिस्थितीतून देवच बाहेर काढू शकतो’, असा विचार यायचा. ‘देवाचे योग्य काय करायचे ?’, ते कळत नव्हते.
६. घरच्या स्थितीचा आईच्या मनावर परिणाम होऊन तिला मनोरुग्णालयात भरती करावे लागणे आणि तिने पुष्कळदा आत्महत्येचा प्रयत्न करणे : काही दिवस गेल्यावर आईच्या मनावर या सर्व गोष्टींचा परिणाम झाला आणि तिला मनोरुग्णालयात भरती करावे लागले. तिला मुख्यतः आध्यात्मिक त्रास असल्याने तो शॉक देऊन न्यून झाला नाही. काही मास (महिने) ती थोडी बरी झाली. त्यानंतर मध्ये ती स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करायची. कधी विहिरीत उडी मारायला जायची. १५ वर्षांत प्रत्येक वर्षातील १० मासांत ती मासातून एकदा स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न करायची. ‘पूर्वपुण्याईमुळेच ती वाचली’, असे वाटते.
७. घरातील प्रत्येकाचे प्रारब्ध तीव्र असल्याने जीवनात आलेल्या अडचणी : वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्रासाची तीव्रता न्यून झाली. घरातील प्रत्येकाचे प्रारब्ध तीव्र असूनही त्या तुलनेत साधना न केल्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीगत जीवनात अडचणी येत आहेत.
अ. भावाचे लग्न झाले आणि सहा मासात (महिन्यांत) त्याचा घटस्फोट झाला.
आ. त्यानंतर बहिणीच्या पतीने लग्नानंतर १० वर्षांनी घटस्फोट हवा असल्याचे सांगितले.
इ. लहान भावाला पसंत असलेली मुलगी वडिलांनी नाकारल्यावर त्याला मानसिक त्रास चालू झाला आणि त्याने आम्हालाही त्रास द्यायला आरंभ केला.
एका ज्योतिषाकडे गेल्यावर त्यांनी वरील सर्व स्थिती काहीही ठाऊक नसतांना तंतोतंत सांगितली.’
– एक साधिका
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |