३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा हिंदूंचा नववर्षारंभ ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती, कोल्हापूर 


कोल्हापूर, २७ डिसेंबर – स्वातंत्र्याची ७३ वर्षे होऊनही आपण सर्व हिंदू इंग्रजी कालगणनेनुसार सर्व व्यवहार करत आहोत. हिंदु कालगणना कित्येक वर्षांपासून आणि युगांपासून चालू आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे करतो. असे करणे म्हणजे अजुनही आपण इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीत जगत आहोत. त्यामुळे ३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडवा हाच खरा हिंदूंचा नववर्षारंभ, हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी व्यक्त केले.

श्री. किरण दुसे

३१ डिसेंबर संदर्भातील प्रबोधन आणि ‘हिंदु कालगणनेचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी ५४ धर्मप्रेमींची उपस्थिती होती. श्री. दुसे यांनी ३१ डिसेंबरच्या नावाखाली चालू असलेले अपप्रकार रोखण्यासाठीचे आवाहन सर्वांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोहित पाटील यांनी केले.

क्षणचित्रे

१. सर्वांनी ‘३१ डिसेंबर साजरा करणार नाही’, हे सांगण्यासाठी ‘जय श्रीराम’, असा संदेश पाठवून प्रतिसाद दिला.

२. कु. आसावरी एरंडे यांनी ‘खूप छान माहिती मिळाली. इतरांनाही सांगेन’, अशा प्रकारचा संदेश पाठवला.