राज्यातील कारागृहातील अपप्रकार रोखण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार ! – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह)
अपप्रकार रोखण्यासाठी वरवरच्या उपाययोजना करणारी कुचकामी प्रशासकीय यंत्रणा !
कोल्हापूर – राज्यातील सर्व मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहातील अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. कारागृहांसाठी अद्ययावत ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवण्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
(गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ? कितीही अत्याधुनिक यंत्रणा जरी वापरल्या, तरी भ्रष्टाचाराच्या वृत्तीत जोपर्यंत पालट होत नाही, तोपर्यंत या सर्व उपाययोजना वरवरच्या ठरतील ! – संपादक)
सुनील रामानंद पुढे म्हणाले, ‘‘कळंबा कारागृहात गेल्या दोन वर्षांत ज्या गंभीर घटना घडल्या आहेत, त्या सर्व प्रकारांचे उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांकडून विभागीय अन्वेषण चालू आहे. दोन आठवड्यांनंतर अहवाल हाती येताच कारवाई दिसून येईल. ‘जेल मॅन्युअल’प्रमाणे कारागृहात घडलेल्या घटनांच्या अन्वेषणाचे अधिकार पोलिसांना आहेत. त्यानुसार भ्रमणभाष, गांजा प्रकरणाचे पोलीस अधिकार्यांकडून अन्वेषण होईल. त्यासाठी कारागृहात विशेष कक्ष उपलब्ध करून देण्यात येईल.’’