मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका झाल्या आहेत ! – विनायक मेटे, आमदार
जालना – सरकारने आरक्षण दिले असले, तरी मराठा आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारने घोडचुका करून ठेवल्या आहेत. नोकर भरतीमध्ये कोणत्या कोट्यातून आरक्षण दिले जाणार आहे ? शैक्षणिक प्रवेशाचे काय ? याविषयी कोणताही स्पष्ट उल्लेख या आरक्षणामध्ये नाही. या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्याचे सोडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजकारण करण्यात गुंग आणि मग्न आहेत, असा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी २६ डिसेंबर या दिवशी येथे एका वृत्तवाहिशी बोलतांना केला.
विनायक मेटे पुढे म्हणाले की, सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि हे सरकार हा संभ्रम वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहे. खरे तर या सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख त्यांनी करायला हवा होता; मात्र तो न करता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राजकारण करण्यातच गुंग आहेत. त्यामुळे ८ लाख रुपयांची मर्यादा असली, तरीही यापूर्वी भरती झालेल्या सर्वांना ई.डब्ल्यू.एस्.मधून नियुक्त्या दिल्या पाहिजेत, अन्यथा सरकारने कितीही अध्यादेश काढले, तरी त्याचा उपयोग होणार नाही.