कळंबा कारागृहाच्या अधीक्षकांचे स्थानांतर
कोल्हापूर – कळंबा कारागृहात फेकलेले १० भ्रमणभाष आणि गांजा प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांचे त्वरित येरवडा कारागृह येथे स्थानांतर करण्यात आले आहे. त्यांचा पदभार पुणे येरवडा येथील सी.एच्. इंदुलकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याविषयीचे आदेश अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात २२ डिसेंबरच्या मध्यरात्री वाहनातून आलेल्या दोन अज्ञातांनी कपड्यांचे ३ गाठोडे फेकले. त्यामध्ये पाऊण किलो गांजा, १० भ्रमणभाष, २ ‘पेन ड्राईव्ह’, ४ ‘चार्जर कॉड’ आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण होते. या प्रकरणी संपूर्ण कारागृहाची पडताळणी करून सखोल अन्वेषण करण्याचे आदेशही वरिष्ठ पातळीवर प्रशासनाला देण्यात आले. या प्रकरणी काही बंदीवानांसह कारागृहातील कर्मचारी अधिकार्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.