नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन
मुंबई – ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात. गंभीर गोष्ट म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्या युवा पिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, महिलांची छेडछाड-विनयभंग-बलात्कार आदींमुळे कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यासाठी ३१ डिसेंबर या दिवशी राज्यातील किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, मेजवान्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश काढावा, तसेच या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलीस दलाचे नियोजन करण्याची मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले आहेत.
या अंतर्गत मुंबईत तहसीलदार कार्यालय बोरीवली येथे तहसीलदार विनोद धोत्रे, बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे, तसेच मालाड पोलीस ठाण्यात गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवतो’, असे तहसीलदार धोत्रे यांनी सांगितले, तर यासाठी आमची गस्ती पथके कार्यरत असतात, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डुंबरे यांनी सांगितले. हे निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. संदीप आबोजवार, श्री. भूषण पाठक, श्री. देवांग भट, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक उपस्थित होते.