देहलीमध्ये मांस विक्रेत्यांना मांस ‘हलाल’ कि ‘झटका’ पद्धतीचे आहे, हे सांगणे बंधनकारक ठरणार !

भाजप शासित दक्षिण देहली महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव

  • अशा प्रकारचा कायदा केवळ देहलीमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे. हलाल पद्धतीमुळे आज मुसलमान समाजाची मांस विक्रीमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाल्याने हिंदु खाटीक समाज बेरोजगार होत आहे. इतकेच नव्हे, तर हिंदूंना वर्ज्य असतांनाही हलाल मांस खावे लागत आहे. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हे चालू रहाणे हिंदूंना, त्यांच्या संघटनांना आणि पक्षांना लज्जास्पद आहे !
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना हलाल मांस का खाऊ नये, हेही ठाऊक नाही आणि ते त्याचा विरोधही करत नाही किंवा त्याविषयी जाणूनही घेत नाहीत !

भाजपच्या नगरसेविका अनिता तंवर

नवी देहली – येथील दक्षिण देहली महानगरपालिकेने त्याच्या अधिकार क्षेत्रातील रेस्टॉरंट आणि मांस विक्रीची दुकाने यांच्यासाठी एक योजना बनवली आहे. यानुसार त्यांच्याकडून बनवण्यात येणारे आणि विकण्यात येणारे मांस ‘हलाल’ पद्धतीचे कि ‘झटका’ पद्धतीचे आहे, याची माहिती ग्राहकाला द्यावी लागणार आहे. मांस विक्रीच्या दुकानावर तशा प्रकारचा फलक आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला तशी माहिती आधीच द्यावी लागणार आहे. या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे.

१. भाजपच्या नगरसेविका अनिता तंवर यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. यात म्हटले आहे की, ‘हलाल’ मांस खाणे हिंदु आणि शीख धर्मियांना निषिद्ध आहे. पालिकेच्या अंतर्गत येणार्‍या ४ क्षेत्रांतील सहस्रो रेस्टॉरंटमध्ये ९० टक्के मांस विक्री केली जाते; मात्र कुठल्याही ठिकाणी ते कशा पद्धतीचे आहे, याची माहिती दिली जात नाही. तसाच प्रकार मांस विक्रीच्या दुकानातही होत आहे. हिंदु आणि शीख यांना ‘हलाल’ मांस वर्ज्य असल्याने त्यांना याची माहिती होणे आवश्यक आहे.

(सौजन्य : TIMES NOW)

२. पालिकेच्या स्थायी समितीने या प्रस्तावाला संमती दिली आहे. आता हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. येथे भाजपचे बहुमत असल्याने ते संमत होणार आहे.

३. स्थायी समितीचे अध्यक्ष राजदत्त गेहलोत यांनी सांगितले की, हा प्रस्ताव आणण्याचे कारण की ग्राहकाला हे ठाऊक असेल पाहिजे की, तो रेस्टॉरंटमध्ये जाऊन किंवा मांसाच्या दुकानात जाऊन कोणत्या पद्धतीचे मांस खात आहे किंवा विकत घेत आहे. सध्या असेही दिसून आले आहे की, पालिकेकडून परवाना घेतांना विशिष्ट प्रकारच्या मांसाच्या विक्रीचा परवाना मागितला जातो; मात्र तेथे अन्य प्रकारच्या मांसाची विक्री केली जात आहे.

हलाल मांस म्हणजे काय ?

‘झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’चे अध्यक्ष रवि रंजन सिंह यांनी सांगितले की, हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याची हत्या केली जाते. यामध्ये प्राण्याची मान एकाच वारमध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो. याउलट हलाल पद्धतीने प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वाहते आणि नंतर तडफडून तडफडून त्याचा मृत्यू होतो. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो. तसेच हे काम मुसलमानेतरांना दिले जात नाही. आज ‘मॅकडोनल्ड’ आणि ‘लुसिअस’सारखी आस्थापने केवळ हलाल मांसांचीच विक्री करत आहेत.