गोव्याची खरी ओळख जगभर पोचवणे आवश्यक ! – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

श्री क्षेत्र तपोभूमी येथे हिंदूसंघटक कार्यकर्ता मेळावा

प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

कुंडई, २५ डिसेंबर (वार्ता.) – गोव्याची खरी ओळख जगभरात पोचवण्यासाठी शासनाने गोव्याचा खरा इतिहास शिकवणे आवश्यक आहे. गोव्याच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून तो लोकाभिमुख करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत. ‘गोवा’ या नावातच ‘गो’ असल्याने गोपालनासाठी गोव्यातील देवस्थानांनी संकल्पित व्हावे. हिंदु धर्मातील सण, उत्सव आदींची विज्ञानावर आधारित ज्ञानाची माहिती सर्वांनी जाणून घ्यावी. यामुळे हिंदु धर्माकडे पहाण्याच्या दृष्टीकोनात पालट होईल, असे मार्गदर्शन तपोभूमी, कुंडई येथील पिठाधीश प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांनी केले. प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र तपोभूमी येथे हिंदूसंघटक कार्यकर्ता मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज मार्गदर्शन करत होते. या मेळाव्यात राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने धर्मजागृती, देवस्थान रक्षण, संस्कृती संरक्षण, गोरक्षा, श्रीराम मंदिर, शैक्षणिक कार्य आदी विविध विषयांवर विचारमंथन झाले.

प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज मेळाव्यात पुढे म्हणाले, ‘‘देवस्थानांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर रहाणे आवश्यक आहे. देवस्थानांनी राष्ट्र उभारणीसाठी संघटित होणे आणि गोरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.’’