शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडू
वाळपई, २५ डिसेंबर (वार्ता.) – शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ गेले ४ मास प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी येणार्यांना अडवून प्रकल्पाला विरोध दर्शवत आहेत. आता ग्रामस्थांनी प्रस्तावित आयआयटी प्रकल्प पुढील आठवड्याच्या आत रहित करून तो अन्यत्र स्थलांतरित करा अन्यथा यापुढे शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ आल्तिनो, पणजी येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडतील, अशी चेतावणी शासनाला दिली आहे. शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे प्रस्तावित आयआयटीचे सर्वेक्षणाचे काम गेले अनेक मास खोळंबले आहे. ‘शेळ-मेळावली येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प होणारच’, असा दावा करणारे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावरही स्थानिकांनी टीका केली आहे.