परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमातील स्वच्छता आणि साधना यांविषयी केलेले मार्गदर्शन
१. आश्रमातील खोल्यांमध्ये स्वच्छता केली न जाणे किंवा वारंवार त्याच चुका होणे, असाच भाग आश्रमाच्या अन्य कार्यपद्धतींसंदर्भातही होत असल्याचे जाणवून ‘त्यासाठी साधनेच्या स्तरावर काय करायचे ?’, हे लक्षात न येणे
‘दैनिकात चौकट वाचली की, स्वच्छता असेल, तर देवालाही तेथे यावे लागेल. चौकट वाचल्यावर असे जाणवले, ‘आश्रमात काही वेळा मी ज्या खोलीत रहाते, तेथे स्वच्छता नियमितपणे होत नाही. त्यासंदर्भात कार्यपद्धती ठरलेल्या असूनही असे होते. साधिकांना सांगूनही वारंवार त्याच त्याच चुका होतात किंवा अस्वच्छता रहाते. उत्तरदायी साधिकांनीही याविषयी अनेक वेळा स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतले, तरी त्याच त्याच चुका पुन्हा होत रहातात. याविषयी ‘अजून काय करायचे ?’, हे नेमके कळत नाही. हा भाग केवळ या स्वच्छतेसंदर्भातच नाही, तर काही वेळा आश्रमातील इतर कृती आणि कार्यपद्धतींसंदर्भातही होतो. अशा वेळी ‘साधना म्हणून कसे वागायला हवे ?’, हे कळत नाही.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वच्छतेतील अडचणींविषयी सांगितलेली महत्त्वाची सूत्रे
अ. खोली स्वच्छता जर गडबडीच्या वेळी रहात असेल, जसे अधिवेशन किंवा काही समारंभ आहे, तर त्या वेळी तारतम्याने घ्यावे. जेवढे शक्य आहे, तेवढे स्वच्छ, नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. आता असे समारंभ सातत्याने होतातच, तर त्यासंदर्भातही कार्यपद्धती ठरवू शकतो.
आ. कार्यपद्धती ठरवूनही पालन होत नसेल, तर पुढे उत्तरदायी साधकाला लिहून देणे, ही आपली साधना आहे.
इ. उत्तरदायी साधकाने सत्संग घेऊनही त्याच त्याच चुका होत असल्यास संबंधितांबाबत प्रायश्चित्त पद्धत अवलंबणे, ही साधना आहे.
ई. प्रायश्चित्तपद्धतीचे अवलंबन करूनही त्यांच्यात पालट होत नसेल, तर त्यांच्या साधनेची हानी होईल आणि देव त्यांना कर्मफलन्यायानुसार फळ देईल.
३. अयोग्य घडतांना दिसत असेल, तर ‘त्यात योग्य काय ?’, हे जाणणे आणि ते होण्यासाठी पुढच्या पुढच्या टप्प्याला जाऊन प्रयत्न करणे, ही साधना असणे, तसेच हा संस्कार आपल्या मनावर होऊन तशी आपली वृत्ती निर्माण होणे आवश्यक असणे
अयोग्य कृती थांबवण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘पुढे पुढे कसे सांगायचे ?’, अशी शंका साधना म्हणून आपल्या मनात यायला नको. व्यवस्थेत काही पालट घडत नसेल, तर काही करायचे कि नाही ? देशभरात अनेक अयोग्य घटना घडत असतात. त्याविषयी साधक, हिंदुत्वनिष्ठ इत्यादी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. काही वेळा ‘तक्रार नोंदवूनही काही होणार नाही’, हे सर्वांना ज्ञात असते, तरी तसे केले जाते. आपल्या सभोवताली ‘काय अयोग्य आहे ? त्यात योग्य काय असू शकते ? ते होण्यासाठी मी काय करू शकते ?’, हे जाणण्याची, जाणल्यावर ते करण्याची वृत्ती आपल्यात निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा संस्कार होणे महत्त्वाचे आहे. हे बीज आहे, ते लहान लहान कृतींतून आपल्यात येेऊन ती वृत्ती निर्माण होणार आहे. यासाठी हे सर्व आपल्याला करायचे आहे. इतरांमध्ये पालट होणार कि नाही ?, यासाठी नव्हे, तर ‘माझ्यात तो संस्कार व्हावा’, यासाठी हे करायचे आहे. हे करतांना आजूबाजूला पालट होत जाऊन त्यातूनच पुढे हिंदु राष्ट्र येणार आहे.’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०१७)