शरद पवार यांच्याविषयी ‘जाणता’ नव्हे, तर ‘विश्वासघात राजा’ म्हणून लिहिले जाईल ! – माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सडकून टीका
सांगली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे म्हणणे मनावर घेऊ नये. पवार साहेब जे बोलतात त्याचे उलट करतात. पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ‘बाजार समित्या बंद झाल्या पाहिजेत’, असे लिहिले आहे. तेच आता कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी पवारांना शेतकर्यांचा ‘जाणता राजा’ नव्हे, तर शेतकर्यांचे ‘विश्वासघात राजा’, असे लिहिले जाईल, अशी टीका माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
नव्या कृषी कायद्याला पाठिंबा देण्याकरिता रयत क्रांती संघटना आणि भाजप यांच्याकडून ‘किसान आत्मनिर्भर यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २४ डिसेंबर या दिवशी क्रांतीसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव येडेमच्छिंद्रगड या ठिकाणी करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह रयत क्रांतीचे सदस्य आणि भाजप पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे नेते आणि माजी मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, ‘‘देशातून गोरे गेले आणि काळे इंग्रज आले. त्यांनी शेतकर्यांना लुटण्याचे काम केले. नेहरू यांनी औद्योगिक क्रांती होण्यासाठी शेतकर्यांचा माल अल्प किमतीत घेण्याचे धोरण चालू केले. त्यामुळे शेतात पिकणारा शेतकर्यांचा माल स्वस्त दरात रेशन दुकान मिळण्यास प्रारंभ केला. शेतकर्यांना तुडवण्याचे काम काँग्रेसने केले. राहुल गांधी आता विचारतात, ‘हे विधेयक कसे आणले ?’. वास्त्ाविक तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी काय केले ते अगोदर त्यांनी पहावे.’’
विधान परिषदेच्या मोहापोटी राजू शेट्टी यांच्याकडून अडत्यांसह व्यापार्यांची दलाली ! – आशिष शेलार, भाजप
या वेळी आशिष शेलार म्हणाले, ‘‘विधान परिषदेच्या मोहापायी राजू शेट्टी हे पिंजरा चित्रपटातल्या तमाशातल्या फडावर गेलेल्या शिक्षकांप्रमाणे अडते आणि व्यापारी यांची दलाली करत आहेत. शरद जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे होत असेल, तर विरोध करणार्यांच्या पोटात का दुखत आहे ? आता आस्थापने आणि व्यापारी थेट शेतकर्यांच्या दारात येऊन भाव ठरवणार आहेत. तर याला विरोध कशासाठी ?’’