हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांनी मुख्यमंत्र्याच्या नावे पाठवले १ सहस्र ८०० रुपयांचे धनादेश
संपूर्ण हानीचा पीक विमा मिळाला नसल्याचा निषेध
पीक विम्याची हास्यास्पद हानीभरपाई !
हिंगोली – जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे संपूर्ण पिकांची १०० टक्के हानी झाल्यानंतर पिक विमा आस्थापनांनी हेक्टरी ४० ते ४३ सहस्र रुपये हानीभरपाई देणे आवश्यक होते; मात्र पीक विमा आस्थापनांकडून केवळ १ सहस्र ८०० रुपये हानीभरपाई शेतकर्यांना देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह अन्य शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे १ सहस्र ८०० रुपयांचे धनादेश पाठवून निषेध केला आहे. पीक विमा आस्थापनाने नियमाप्रमाणे पीक विमा देण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात या वर्षी १२४ टक्के पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, कापूस या पिकांची मोठी हानी झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता या वर्षी ३ लाख शेतकर्यांनी पीक विमा काढला होता. यामध्ये सर्वांत अधिक सोयाबीनचा पीक विमा काढला होता. त्यासाठी हेक्टरी ९०० रुपयांची रक्कम शेतकर्यांनी पीक विमा आस्थापनाकडे भरली होती, तर २०० रुपये ‘ऑनलाईन’ विमा भरण्यासाठी लागले होते.