माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या येत्या एका मासात सोडवण्याचे आश्वासन
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन आणि अन्य खाती यांच्याअंतर्गत माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या येत्या एका मासात सोडवण्याचे आश्वासन कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कामगार आणि गृह विभाग यांच्या अधिकार्यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
माथाडी कामगार हा घटक नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उतार करण्याची कामे करीत असल्याने त्यांना १ जानेवारीपासून रेल्वेने प्रवास करण्याची अनुमती देण्याचे आश्वासन या बैठकीत मंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ डिसेंबर या दिवशी लाक्षणिक संप केला होता. त्या वेळी सरकारने संप मागे घेऊन चर्चा करण्याची सिद्धता दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कामगारांना संबंधित विमा कवच संरक्षण लागू करणे, माथाडी मंडळाची पुनर्रचना करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना संधी देणे, माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, बाजार समित्यांचे नियमन कायम करणे, मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतूद करणे, नाशिक येथील कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न सोडवणे आदी प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.