नगरमधील एका व्यक्तीला ७० लाखांना गंडा घालणारा नायजेरीन नागरिक पोलिसांच्या हाती
भारतात पुष्कळ मोठ्या प्रमाणात नायजेरीयन येऊन अमली पदार्थ विकण्यापासून विविध प्रकारचे गंभीर गुन्हे आणि दादागिरी करतात. ते धिप्पाड असल्याने आणि त्यांच्याजवळ शस्त्र असल्याने कित्येकदा पोलीसही त्यांना भितात. अशा गुन्हेगार नायजेरीयन व्यक्तींना भारतात येणे आणि रहाणे शक्य होणार नाही, अशा उपाययोजना सरकार का करीत नाही ?
नगर – सामाजिक माध्यमांवर मैत्री करून नंतर ‘हर्बल प्रॉडक्ट’ खरेदीच्या बहाण्याने नगरमधील एका उच्चशिक्षित व्यक्तीला ७० लाखांना गंडा घालणारा नायजेरीन नागरिक पोलिसांच्या हाती लागला आहे. रिझर्व्ह बँकेचा अधिकारी असल्याचे भासवून बनावट इमेल आणि कागदपत्रांचा वापर करून या आरोपीने फसवणूक केली आहे. देहलीत जाऊन नगरच्या पोलीस पथकाने त्याला पकडले आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात हा गुन्हा घडला आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना ‘नायजेरीयन फ्रॉड’ असेही म्हणतात. ‘नायजेरीयन फ्रॉड’ करणारे गुन्हेगार देहली परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. तेथील अवैध कॉलनीमध्ये ते वेळोवेळी जागा पालटून रहातात, असे पोलिसांनी सांगितले.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची सामाजिक माध्यमांवरून आलेली ‘रिक्वेस्ट’ (विनंती) स्वीकारू नये. कोणत्याही लोभाला बळी पडू नये. अशा सूचना अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केल्या आहेत.