मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथील ‘अॅमेझॉन’च्या कार्यालयांची तोडफोड
मागणी करूनही ‘अॅप’मध्ये मराठीचा वापर न केल्याचा परिणाम
सरकारनेच अशा आस्थापनांना मराठीची सक्ती करायला हवी, असे जनतेला वाटते !
मुंबई – ‘अॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्या ‘अॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या वादातून २५ डिसेंबर या दिवशी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील कोंढवा, मुंबईतील चांदिवली आणि संभाजीनगर येथील ‘अॅमेझॉन’च्या कार्यालयांची तोडफोड केली.
‘अॅप’मध्ये मराठी भाषेच्या उपयोग करावा, अशी विनंती मनसेकडून ‘अॅमेझॉन’ला करण्यात आली होती. या मागणीला प्रारंभी सकारात्मक प्रतिसाद देणार्या ‘अॅमेझॉन’ने मनसेच्या विरोधात थेट दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. यावर मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ‘अॅमेझॉन’ला सह्याद्रीचे पाणी पाजणारच’, अशी चेतावणी दिली आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे.