वेंगुर्ला शहरात चालू असलेल्या भूमीगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी
वेंगुर्ला – शहरात सध्या भूमीगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम चालू असून ठेकेदार हे काम योग्य प्रकारे करत नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांना त्रास होत आहे. वाहतुकीचे कोणतेही नियोजन न केल्याने शहरात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता मनीष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भूमीगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदकाम करतांना वाहतुकीसाठी लागणारे कोणतेच नियोजन ठेकेदाराने तथा संबंधित प्रशासनाने केलेले नाही, तसेच ठेकेदार आपल्या मनप्रमाणे रस्त्यांचे खोदकाम करत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक, तसेच पादचारी यांना होत आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून मातीचे ढिगारे करून ठेवल्याने शहरातील नागरिकांना त्रास होत असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे आरोग्याचा त्रास निर्माण होऊ शकतो. माती रस्त्यावर टाकल्याने वाहने घसरून अपघात होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यास त्यास केवळ संबंधित ठेकेदार, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि वेंगुर्ला नगरपरिषद उत्तरदायी असेल. त्यामुळे संबंधित ठेकेदार, प्रशासन आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांनी वाहतुकीचे योग्यरित्या नियोजन करून आणि सर्वांची काळजी घेऊन मगच रस्त्यांचे खोदकाम करावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधितांना भोगावे लागतील.